केंद्राचा बियाणे नियंत्रण कायदा कठोर होणार

0
20

मुंबई दि.३१:- बोगस आणि निकृष्ट बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध परिणामकारक कारवाई करता यावी म्हणून बियाणे नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक केंद्र सरकार संसदेच्या चालू अधिवेशनात मांडणार आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत गुरुवारी प्रश्‍नोत्तराच्या वेळी ही माहिती सांगितली. केंद्राचा सध्याचा बियाणे नियंत्रण कायदा कमजोर आहे. त्यात दोषी कंपनीला पहिल्या गुन्ह्याबद्दल पाचशे रुपये दंड एवढीच किरकोळ शिक्षा देण्याची तरतूद आहे, असे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणले.

राज्यात सोयाबीन बियाणांचे 20 नमुने अप्रमाणित असल्याचे एप्रिल 2015 मध्ये तपासणीत आढळल्याचे कृषिमंत्र्यांनी कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक आणि इतर तीन सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई चालू आहे, असे ते म्हणाले. शेतजमिनीत वीजवाहक टॉवर उभारणी करताना देण्यात येणाऱ्या मोबदला योजनेचा केंद्र सरकार विस्तार करणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पांडुरंग फुंडकर यांच्या प्रश्‍नावर सांगितले.