राहुल गांधीचा FTII आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा

0
43

पुणे दि. ३१ – फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (FTII) नवनिर्वाचित अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीवरून राजकारण चांगलेच रंगले आहे. FTII च्या वादात भाजप पाठोपाठ आता कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. सुमारे 250 विद्यार्थ्यी या आंदोलनात सहभागी आहेत. विद्यार्थी 3 ऑगस्टला दिल्लीत आंदोलन करणार आहेत.

राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल म्हणाले, केंद्राच्या मताशी सहमत नसाल तर आंदोलने चिरडली जातात. संपूर्ण देशात FTII सारखी परिस्थिती आहे. मी तुमच्या पाठिशी आहे, मात्र, तुम्ही खंबीर राहा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. सर्व ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण्यांची ढवळाढवळ सुरुच असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार विद्यार्थ्यांवर अक्षरश: लादले जात असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. 250 विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकार एवढे त्रस्त का आहे? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.विद्यार्थ्यांना गजेंद्र चौहान अध्यक्षपदावर नको असतील, तर त्यांनी पदावर राहू नये, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.

‘राहुल यांच्यात FTII च्या विद्यार्थ्यांना कोणता अभिनेता दिसला?
राहुल यांनी FTIIच्या वादात उडी घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चौफेर टीका सुरू केली आहे. भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आहे. ‘राहुल यांच्यात FTII च्या विद्यार्थ्यांना कोणता अभिनेता दिसला?’ असा खोचक सवालही परेश रावल यांनी केला आहे. त्याचबरोबत भाजपच्या प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सलमान खान, अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, अमोल पालेकर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे.