मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्योत्पादन करावे – अनूप कुमार

0
21

गोंदिया दि. ३ –: तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात जलक्षेत्र मोठे असून नैसर्गिक संपत्तीही विपुल प्रमाणात आहे. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था पारंपरिक पद्धतीने मासेमारी करीत असल्यामुळे उत्पादन कमी मिळत आहे. या संस्थांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्योत्पादन केल्यास मोठ्या प्रमाणात माशांच्या उत्पादनातून आर्थिक ‍स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे मत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी व्यक्त केले.

अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्र तिरोडा येथील सभागृहात 18 मत्स्य सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना मार्गदर्शन करतांना श्री. कुमार बोलत होते. मत्स्यव्यवसाय विभाग आणि अदानी फाऊंडेशन तिरोडा यांच्या सहकार्याने जिल्ह्यात भूजल मत्स्योत्पादन वाढविण्याचा पथदर्शी प्रकल्प 18 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख सी.टी. साहू, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे महाप्रबंधक मोहन पांडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत पाडवी, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, जिल्ह्यातील मासेमारी संस्थांनी आता माशांसोबत झिंगा उत्पादनाकडे वळावे. जिल्ह्यात जास्तीत जास्त मत्स्योत्पादन केल्यास बाहेर जिल्ह्यात सुद्धा मासे विक्रीसाठी पाठविता येतील. सोसायटीने स्वार्थीवृत्ती बाजूला ठेवून समाजातील बांधवाच्या हितासाठी काम करावे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडूनही मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या विकासासाठी आपण तयार असल्याचे श्री.कुमार यांनी सांगितले.

गोड्या पाण्यातील मत्स्यजिऱ्यांचे उत्पादन जिल्ह्यातील संस्थांनी मोठ्या प्रमाणात करावे असे सांगून श्री. कुमार म्हणाले, त्यामुळे त्या संस्थांना माशांच्या उत्पादनासोबत मत्स्यजिरे विक्रीतून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. इथला मत्स्यजिरा विक्रीसाठी कलकत्याच्या बाजारपेठेत गेला पाहिजे. पथदर्शी प्रकल्प राबवितांना संस्थांच्या अडचणी व मत्स्योत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले माहिती संस्थांच्या सभासदाना घ्यावी.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात गोंदिया जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा यासाठी मत्स्य सहकारी संस्थांनी लक्ष द्यावे. माशांसाठी लागणारे खाद्य व मासेविक्रीची बाजारपेठ याचाही अभ्यास संस्थांनी करावा. गोंदिया येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मासेविक्रीचे चांगले मार्केट उभे करण्याचा विचार आहे. जिल्ह्यातील मासेमारी कुटुंबातील महिलांना संघटीत करुन मत्स्योत्पादनात महिलांचा सहभाग जीवन्नोती अभियानातून घेणार आहे.

मत्स्य सहकारी संस्थांशी करार करुन इटियाडोह येथील मत्स्यबीज निर्मिती केंद्र पूर्णक्षमतेने सूरु करण्याचा विचार आहे. आंध्र व पश्चिम बंगाल राज्यातील मत्स्यविभागाशी संपर्क साधून जिल्ह्याच्या मत्स्यविकासासाठी त्यांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्यात मोबाईल मासेविक्री केंद्र सुरु करण्याचा विचार आहे. दरमहा जिल्हा मासेमार संघाची सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.