महालगांवची जलयुक्त क्रांती : 139 शेततळ्यातून झाले 375 एकर संरक्षित सिंचन

0
37

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवारमध्ये वरोरा कृषी विभागाच्या वतीने महालगांव पाणलोट क्षेत्रात शेततळ्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेली शेततळी पावसाच्या पाण्याने तुडूंब भरली आहेत. सिंचनाची कुठलीही सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेततळे वरदान ठरत आहेत. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने राबविलेला शेततळे कार्यक्रम शेतकऱ्यांना नवी संजीवनी देणारा ठरला आहे.

जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील 19 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम व जलयुक्त शिवार मिळून करण्यात आलेल्या 139 शेततळ्यात काठोकाठ पाणी भरले असून यामुळे 375 एकर संरक्षित सिंचन होणार आहे. यासोबतच 6 जुने सिमेंट बांध नाला खोलीकरणामुळे शेतातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या कामामुळे या परिसरातील पीक घनता 147 टक्के वाढली आहे.

कोरडवाहू शेत्रातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव पाणलोट क्षेत्रात कृषी विभागाच्या वतीने जुने सिमेंट नाला बांध खोलीकरण व शेततळ्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम व जलयुक्त शिवार या अंतर्गत 139 शेततळे व 6 जुने सिमेंट नाला बांध खोलीकरण करण्यात आले. या सोबतच 900 ढाळीचे बांध तयार करण्यात आले आहे. या बांधामुळे पावसाचे पाणी शेतातच जिरणार असून अतिरिक्त पाणी नालीवाटे निघून शेततळ्यात जमा होणार आहे. यामुळे शेतातील गाळ वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन शेताच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

सोयाबीन, कापूस व हरभरा या पिकासाठी शेततळे नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत. महालगांव परिसरातील शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृषी विभागाच्या सहाय्याने शेततळ्याच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचे अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. या चार गावांत 30 बाय 30 चे व 20 बाय 20 चे लहान मोठे 139 शेततळे तयार करण्यात आले आहेत. या शेततळ्याच्या माध्यमातून 375 एकर जमिनीचे संरक्षित सिंचन होणार आहे.

शेततळे व नाला खोलीकरणामुळे खरीप व रब्बी पिकाची उत्पादकता वाढली आहे. मागील वर्षी कापूस 4 ते 6 वरुन 10 ते 12 क्विंटल, तूर 4 वरुन 6 क्विंटल, सोयाबीन 9 वरुन 14 क्विंटल, धान 11 वरुन 14 क्विंटल, गहू 12 वरुन 15 क्विंटल व हरभरा 5 वरुन 8 क्विंटल एकरी उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वरोरा तालुका कोरडवाहू म्हणून गणला जात असून या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात. सोयाबिन, कापूस व हरभरा हे पीक घेणारे शेतकरी या परिसरात मोठ्या प्रमाणात असून या शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेततळ्यांचा मोठा हातभार लागणार आहे. महालगांव परिसरात 6 जुने सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामामुळे शेतातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. शेततळ्यासोबतच ढाळीच्या बांधामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे. कृषी विभागाचा ढाळींचे बांध व शेततळे कार्यक्रम राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, तालुका कृषी अधिकारी अरुण खगंण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सिंचनासाठी शेततळे वरदान- राजवाडे

महालगांव परिसरातील शेतकऱ्यांनी शेततळ्याची योजना प्रभावीपणे राबवून 139 शेततळे तयार केले. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेततळे संरक्षित सिंचनासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत व यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल असे उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

-रवी गिते
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर