गोंदिया जिल्हा बँकेने केले १0८ टक्के कर्जवाटप

0
6

१0२ कोटींची कर्ज वसुली

गोंदिया : ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा शेतकर्‍यांची हितचिंतक असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हा बँकेने १0८ टक्के खरिप हंगामाचे कर्जवाटप केले असून अजूनही कर्जवाटप सुरूच आहे. जिल्हा बँकेने या हंगामात ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे.कर्जवाटपात जिल्हा बँक आघाडीवर असली तरी कर्ज वसुलीत मात्र येत असलेल्या अडचणींमुळे बँकेपुढे २४५ कोटी ७१ लाख रूपयांच्या वसुलीचा डोंगर उभा आहे. एखादा हंगाम शेतकर्‍यांना नुकसानीचा ठरल्यास त्या काळात शेतकर्‍यांकडून वसुली करणे कठिण जाते. अशाच प्रकारे बँकेपुढे वसुलीचा एवढा डोंगर उभा झाले आहे. ७ ऑगस्टपर्यंत १0२ कोटी ६३ लाख ८८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्ह्याला धानाचे कोठार अशी ख्याती देण्यात असली तरीही निसर्गाची अवकृपा यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते.परिणामी येथील शेतकर्‍याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. तर शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक र्‍यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते.
कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अग्रेसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकर्‍यांचा जिल्हा बँकेवरील विश्‍वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकर्‍यांप्रती असलेला आत्मीयतेचा भाव दिसून येतो. परिणामी जिल्हा बँक ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. जिल्हा बँकेने ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठले असूनही आता त्यापलीकडे कर्जवाटप करीत आहे जिल्हा बँकेला ८८ कोटी ६३ लाख रूपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने उद्दीष्ट पूर्ती केली असून ३२३ संस्था, ३0 हजार ४१६ सभासद व ८८ हजार ११३ आराजी करिता ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. याची चक्क १0८ एवढी टक्केवारी आहे.