अनिल अंबानी मिहानचे ब्रॅंड ॲम्बेसीडर

0
18

नागपूर दि. २९ : मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन उद्योग सुरु करण्याच्या प्रोत्साहनानूसार रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल धीरुभाई अंबानी यांनी देशातील पहिला एअरोस्पेश पार्क प्रकल्प मिहान येथे सुरु करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र शासनातर्फे या उद्योगासाठी केवळ सोळा दिवसात जागा उपलब्ध करुन देण्यात आली. रिलायन्स गुप्रच्या या प्रकल्पामुळे मिहानमध्ये जगातील उद्योजक गुंतवणूक करण्याची सुरुवात झाली असून उद्योजकांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एअरो स्पेश पार्क हा प्रकल्प नागपूर विदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हॉटेल सेंटरपाईंट येथे एअरोस्पेश पार्कसाठी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल धीरुभाई अंबानी यांना मिहानमध्ये 289 एकर जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात संमती पत्र हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार असल्यामुळे उद्योजक मोठया प्रमाणात या सोहळयास उपस्थित होते.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रविण दटके, खासदार अजय संचेती, विजय दर्डा, कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे, सुनिल केदार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, समीर मेघे, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, समीर पुनावार तसेच अप्पर मुख्य सचिव पी.एस.मीना, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष तानाजी संत्रे तसेच विदर्भातील सर्व लोक प्रतिनिधी उपस्थित होते.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशातील पहिला प्रकल्प मिहानमध्ये सुरु होत असल्याचा आनंद व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठया प्रमाणात जागतिक गुंतवणूक यावी यासाठी जाणीव पूर्वक सुरु असलेल्या प्रयत्नामुळे रिलायन्स गुप्रचा महत्वकांक्षी प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी मिहानची व महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. रिलायन्स उद्योगाला जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात केवळ पंधरा दिवसात जमीनीचे हस्तांतरण सोहळा होत असून गतीमानता काय असते याचा परिचय शासनाने करुन दिला आहे.

संपूर्ण जगामध्ये अनिल अंबानी यांनी मिहानचे सकारात्मक मार्केटिंग केले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अनिल अंबानी हे मिहानचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर ठरले असे म्हटले तर वावगे होणार नाही. नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक यायची असेल तर नागपूर हे एज्युकेशन हब झाले पाहिजे. पुणे प्रमाणेच तज्ञ मानव संसाधन निर्माण करण्याला प्राधान्य दिल्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयआयएमसह सहा संस्था सुरु होत आहे. जागतिक उत्पादनाच्या क्षेत्रात नागपूर विदर्भात उद्योग यावेत यासाठी राज्याचा औद्योगिक धोरणात तसेच उद्योजकांना सुलभपणे उद्योग उभारणीला सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागासभागामध्ये उद्योगाचा विकास व्हावा व येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, फ्रॅब्रीक टू फॅशन अंतर्गत प्रत्येक जिल्हयात उद्योगाचे जाळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास करण्यासोबतच येथून विमानासह कार्गे सेवा सुरु करण्यालाही कतार एअरवेज आदींनी संमती दिली आहे. त्यामुळे युरोपसह विविध देशातील उद्योजक मिहानसोबत जोडल्या जाणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाचा विकास व्हावा ही येथील जनतेची भावना असून उद्योग व पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास येथील युवकांना रेाजगार उपलब्ध होणार आहे. मिहानच्या संदर्भात बोलतांना ते पुढे म्हणाले की, नागपूरसह विदर्भातील बेराजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी मोठया प्रमाणात उद्योग तसेच गुंतवणूक आवश्यक आहे. त्यामुळे मिहान टास्क फोर्स तयार करुन येथील पायाभूत सुविधांचा निर्मितीला प्राधान्य दिल्यामुळे उद्योजक आकर्षित होत आहेत. एमआरओ तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासन संयुक्तपणे निर्णय घेत आहे.

मिहानमध्ये 50 हजार युवकांना रोजगार मिळावा यासाठी जागतिक स्तरावरील गुंतवणूक येथे व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, नागपूर विदर्भासोबतच संपूर्ण मागास भागांचा विकास व्हावा असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठया एअरोस्पेस पार्कसाठी सर्वदृष्टीने उपयुक्त अश्या मिहानची निवड करण्यात आली असल्याचे सांगतांना महाराष्ट्र शासनाने अत्यंत सकारात्मकतेने व तात्काळ निर्णय घेऊन जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. मेक इन इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या कार्याने प्रभावित होऊन संरक्षण उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रात प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. देशातील पहिला प्रकल्प अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित राहणार असून दक्षिण-पूर्व आशियामध्ये सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाला धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क म्हणून विकसित करण्यात येणार असून नागपूरचे वैभव ठरणारा हा प्रकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूरची स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी निवड झाली असून हे शहर स्मार्ट करण्यासाठी व देशातील शंभर शहरापैंकी टॉपवर राहण्यासाठी रिलायन्स ग्रुपतर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये 86 एकर प्रकल्पासाठी व 50 एकर टाऊनशिप विकसित करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यक्ता आहे. या प्रकल्पामध्ये संरक्षण सामुग्री उत्पादन विमानांच्या इंजिनसह सुटे भाग व हेलिकॉप्टरचा एअरोस्ट्रक्टचर प्रकल्प सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहानच्या विकासासोबतच वीजेचा प्रश्न सोडविण्यात आला असून मिहानसाठी 4 रुपये 40 पैसे या युनिट प्रमाणे कायम विद्युत पुरवठा करण्याचे घोषणा केली. प्रारंभी मिहानचे उपाध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक तानाजी संत्रे यांनी मिहान प्रकल्पाच्या विकासामधील सर्व त्रुटी दूर झाल्या असून प्रकल्पग्रस्तांसाठी पंधराशे कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे आता सर्व प्रश्न सुटले आहे. विमानतळाच्या जागेचे हस्तांतरणाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. एअरोहबच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा रिलायन्स ग्रुपचा प्रकल्प येत्या पाच वर्षात विकसित होणार आहे. या प्रकल्पामुळे सहायक उद्योगही मोठया प्रमाणात निर्माण होतील असेही त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रिलायन्स ग्रुपने उद्योग सुरु करण्यासाठी मिहानची निवड केली. त्यामुळे मिहान हा आज महान झाला आहे. रिलायन्स ग्रुपला राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी जेवढी जागा लागेल तेवढी जागा उपलब्ध करुन देण्यासोबतच पाणी, वीज देण्यात येईल. या उद्योग समूहाने राज्यातील युवकांना रोजगार द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

रिलायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष राजेश धिंग्रा यांनी सादरीकरणाद्वारे रिलायन्स ग्रुपच्या एअरोस्पेस पार्क मध्ये असणाऱ्या सुविधा उत्पादनाची निर्मिती तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रेाजगाराच्या संधी याबद्दल माहिती दिली. या प्रकल्पासाठी देशातील पाच राज्यातील सोळा जागेचा विचार करण्याचा नागपूरचा निर्णय घेण्यात आला. येथे तज्ञ मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी मिहानचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी स्वागत केले. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी, उद्योजक तसेच रिलायन्स ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.