पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

0
11

नवी दिल्ली दि. ३०: औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.दिल्ली अभ्यास दौऱ्यावर असणाऱ्या या 25 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, सहयोगी प्राध्यापिका डॉ. आशा देशपांडे यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक श्री.कांबळे यांनी दिली. परिचय केंद्रातर्फे प्रकाशित होणारे वेगवेगळी प्रकाशने, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क सांभाळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्लीतील मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीविषयीही यावेळी चर्चा झाली. सूत्रसंचालन परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकार-कांबळे उपस्थित होत्या.(‘महान्यूज’)