विदर्भातील बौद्धीक संपदेचा योग्य पद्धतीने वापर व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
18

नागपूर दि. ३०: विदर्भात वनसंपदेबरोबर बौद्धीक संपदा आहे. स्पर्धकांनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत. मात्र जोपर्यंत शिक्षण पद्धतीत बदल व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. आज कुशल मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्याप्रमाणेच नागपूर व बाजूच्या जिल्ह्यात कुशल मानव संसाधन निर्माण करावे लागेल. रिलायन्सचा एरोस्पेस उद्योग मिहानमध्ये येत आहे. त्यासाठी तसे कुशल तंत्रज्ञ निर्माण करावे लागतील. अन्यथा आपले तरुण मागे पडतील, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनच्या शोध निबंध स्पर्धा बक्षीस समारंभात बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, मनोज चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, डॉ. योगानंद काळे, डॉ. लता लांजेवार आदी उपस्थित होते.

विदर्भातील समस्यांवर विदर्भातील युवक मागे का? या विषयावर शोध निबंधाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 1680 स्पर्धकांनी भाग घेतला, हे आपल्या दृष्टीने महत्वाचे असून जशी विदर्भात जल, खनिज व वनसंपदा आहे तशी बौध्दीक संपदाही आहे. परंतू त्या संपदेला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. केवळ पदवी प्राप्त करून चालणार नाही तर आपल्या युवकांना कौशल्य दाखविता आले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे प्रथम पाच विजेते अनुक्रमे प्रा. रोहीत तुरानी, चंद्रपूर (21 हजार रूपये), सुशील माळवी, बुलडाणा (15 हजार रूपये), प्रसाद पवार, (10 हजार रूपये), मृणाल बिसेन (7 हजार पाचशे रूपये) आणि सुधाकर लोमटे, उमरखेड (5 हजार रूपये) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

विदर्भातील कौशल्य विकसित करून त्यांच्या कौशल्याला फिनिशिंग टच देत त्यांना लेबल देणे महत्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशात विविध स्टडी ग्रूप, विविध कमिशन समस्यांवर अहवाल देतात. मात्र त्यापेक्षा ही विदर्भातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत. विदर्भातील युवकांच्या मनात काय आहे. याचा यातून शोध लागला असून स्पर्धकांचे सर्व निबंध आपण पूर्ण अभ्यासणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भातील युवक स्पर्धेच्या युगात कुठेही मागे पडणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेत त्यांना कुशल बनवून रोजगारक्षम बनविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दिले जाईल. नॅसकॉमच्या सर्व्हेनुसार फक्त 25 टक्के अभियंता हे रोजगारक्षम असून ती संख्या वाढविण्यासाठी कौशल्यनिर्मिती मार्केटींग तसेच स्वत:चे प्रेझेंटेशन करण्याची कला अवगत करून देण्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. येत्या काळात जगाला कुशल मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता असून ती पुरविण्याची क्षमता केवळ भारतात असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांना स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी संस्थेबद्दल माहिती दिली, तर सचिव मनोज चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समायोचित भाषण केले. मनोज सालपेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मोठ्या संख्येने युवक, युवती व नागरीक उपस्थित होते.