भारतात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध

0
16

गोंदिया दि.३०-जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात भारतातील हेमीडॅक्‍टीलस कुळातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. सध्या भारतात २६ जातीच्या पालींची नोंद असून हेमचंद्रई या जातीच्या पालीच्या शोधाने ही संख्या आता २७ वर पोहोचली आहे.

नवेगावबांध परिसरात रात्रीच्या वेळी दगडांवर कीटक खाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या या पालीचा रंग फिक्कट किंवा गडद करडा आहे. त्यावर हलके गुणकारी चिन्ह दिसतात. अनेक चळवळीचे उगमस्थान असलेला विदर्भ प्रदेश या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासात मागे पडला आहे. या नवीन जातीच्या पालीच्या शोधातून विदर्भात असलेल्या प्राणीसृष्टीबद्दल जागरूक असल्याचे उघड झाले आहे. या पालीचे अभ्यासक नामकरण पराग दांडगे यांचे वडील कै. हेमचंद्र दांडगे यांच्या नावावरून करण्यात आले आहे. निसर्ग संवर्धनात जसे वाघाचे महत्त्वाचे स्थान आहे त्याचप्रमाणे सरीसृपांचे म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचेही आहे. म्हणूनच या सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे ओळखूनच गेल्या १५ वर्षांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यासक पराग दांडगे आणि आशीष टिपले हे दोघे अभ्यास करीत आहेत. या पालीचा संपूर्णपणे अभ्यास पराग व आशीष यांनी केला. या पालीवरील शोधनिबंध लिहून तो रशियन जर्नल ऑफ हरपेटोलॉजीमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे