२० हजार कोटींचे ‘पंतप्रधान मुद्रा’ योजनेंतर्गत कर्जवाटप

0
6

मुंबई दि.१: – – केंद्र सरकारने बेरोजगार, उच्चशिक्षित तसेच गरजूंना स्वत:चा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभे करण्यासाठी बँकेतून कर्ज देण्याची ‘पंतप्रधान मुद्रा’ योजना सुरू केली. आतापर्यंत देशभरात या योजनेतून २०,३९५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून, जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून कर्ज देण्याच्या प्रमाणात वाढ करावी, अशी तंबीही सरकारने बँकांना दिली असल्याची माहिती केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.

केंद्रातील मोदी सरकारने जनधन, पंतप्रधान विमा योजना, अटल विमा पेन्शन योजनेपाठोपाठ देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगार, उच्चशिक्षितांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा यासाठी त्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळावे म्हणून ‘पंतप्रधान मुद्रा’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना संपूर्ण देशभरात पोहोचावी यासाठी भाजपच्या मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ही जबाबदारी हंसराज अहिर यांच्यावर सोपविली आहे. त्यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

‘पंतप्रधान मुद्रा’ योजनेतर्ंगत ९ खाजगी व स्टेट बँक ऑफ इंडिया या एकमेव बँकेचा अपवाद वगळता २१ राष्ट्रीयीकृत अशा ३० बँकांचा समावेश करण्यात आला आहे. टपरीपासून, चहाचे स्टॉल, वडापावची गाडी, गॅरेज आदी उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. ५० हजारांपासून १० लाखांपर्यंत कर्ज केवळ १२ टक्के व्याजदरावर दिले जाणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.