पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

0
5

मुंबई दि.११-:- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जहाज बांधणी व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

थेट विदेशी गुंतवणुकीतून साकारला जाणारा हा नजिकच्या काळातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत 7915 कोटी असून दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. जागतिक मानकांचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे टर्मिनल्स उभारण्यात येत आहे. रेल्वे आणि रस्तेमार्गाने विशाल कंटेनरची वाहतूक सुलभ आणि सहज व्हावी, यासाठी 45 किलोमीटरचा मोठा रस्ताही तयार करण्यात येणार आहे.

भविष्यातही कंटेनर आयात – निर्यात व्यापार वृद्धीसाठी जेएनपीटीकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध योजनाही तयार केल्या जात आहेत. जेएनपीटी बंदराने आपल्या स्वत:च्या मालकीची दोन बंदरे या आधीच बहुराष्ट्रीय कंपन्यांना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर दिली आहेत. याला जोडूनच आता ५० लाख कंटेनर हाताळणीच्या क्षमतेचे चौथे बंदर उभारणीला जेएनपीटी बंदराने सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात जेएनपीटी बंदरातून दरवर्षी एक कोटी कंटेनर मालाची आयात – निर्यात होणार आहे. बंदरात मोठमोठी मालवाहू जहाजे लागण्यासाठी समुद्र चॅनेलची खोली १४ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १० हजार कंटेनर क्षमतेची मालवाहू जहाजे बंदरात सहजगत्या स्थिरावू लागली आहेत.

पंतप्रधान तसेच त्यांच्यासमवेत आलेल्या प्रमुख अतिथीचे जेएनपीटी हेलीपॅडवर जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, नौकानयन सचिव राजीव कुमार, विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी स्वागत केले. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंतप्रधानांना पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीष भिमाणी यांनी केले.