मोतीरावण कंगाली यांचे निधन

0
16

नागपूर,दि.31: आदिवासी बांधवांचा धर्मग्रंथ ‘कोयापुणेम’चे लेखक तथा गोंडी संस्कृतीचे अभ्यासक डॉ. मोतीरावण कंगाली (६६) यांचे शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी चित्रलेखा तसेच श्रृंखला, वेरुंजली व डॉ. विनंती या तीन मुली असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. ३१) दुपारी १२ वाजता दुलारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. कंगाली यांचा जन्म रामटेक तालुक्यातील देवलापारनजीकच्या दुलारा या गावात २ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण दुलारा व बोथियापालोरा येथील शाळेत तर उच्च शिक्षण नागपुरात पूर्ण केले. त्यांनी ‘कोयापुणेम’ या ग्रंथासोबतच २१ ग्रंथांची निर्मिती केली.
ते भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदावरून सेवानवृत्त झाले होते. या गं्रथांमधून त्यांनी समाज जागृतीसोबतच आदिवासी बांधवांची जीवनशैली जगासमोर मांडली.
यासाठी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, मेळघाट, गोंदिया, भंडारा तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये कोयापुणेम संमेलनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.
मोहेंजोदडो व हडप्पा येथे आढळलेल्या लिपीचा अभ्यास करून त्यांनी ‘सैंधनी लिपिका गोंडी मे उद्वाचन’ या ग्रंथाची निर्मिती केली.
तसेच गोंडी भाषा व्याकरण, हिंदी – गोंडी शब्दकोश, गोंडी करियाट यासह अन्य पुस्तकांचे लेखन केले. गोंडी भाषा ही सर्व भाषांची जननी असल्याचे त्यांचे ठाम मत होते.