क्रीडा क्षेत्राकडे युवावर्गाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता – पालकमंत्री बडोले

0
18

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा

गोंदिया, ३१ : देशात खेळांकडे औपचारीकतेने बघितले जाते. ऑलींम्‍पीकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत पदकांची मोठी कमाई करण्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी क्रीडा क्षेत्राकडे युवावर्गाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज (ता.३१) रामनगर येथील नगर परिषद शाळेत आयोजित राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांनी केले, याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, भाजपा शहराध्यक्ष भरत क्षत्रीय यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, ऑलीम्पीक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्यात चीन सर्वात पुढे असतो. भारत व चीनचे हवामान आणि भौगोलिक परिस्थीती सारखी आहे. चीनने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. चीनसारख्या देशात खेळाला प्रोत्साहन मिळते. आपल्या देशात खेळाकडे दुर्लक्ष आहे. समाजातील विविध घटक व सरकारने क्रीडा स्पर्धेकरीता चांगल्या दृष्टीने काम करावे. जिल्हा मागास व उपेक्षित असला तरी जिल्हयात राजकारणापलीकडचे काम झाले पाहिजे, तरच जिल्हयाचा निश्चितच विकास होईल असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी भविष्यात जिल्हयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार अग्रवाल म्हणाले, गोंदिया येथे राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल उभे होत आहे. इंदिरा गांधी स्टेडीअमचा चेहरामोहरा बदलत आहे. फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली असून लॉन टाकण्यात आले आहे. जिल्हयाच्या विकासासाठी आपण पालकमंत्र्यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा संकूलाचे काम पूर्ण होताच हे संकूल जिल्हयातील खेळाडूंच्या सेवेकरीता कामी येईल असेही ते म्हणाले.
खा.पटोले म्हणाले, आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. युवकांनी खेळामध्ये चांगली प्रगती केली आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरण आखून राज्यांना क्रीडा क्षेत्रासाठी जादा निधी उपलब्ध करुन देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. खेळाडू घडविणारे क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये असले पाहिजे अशी आपण राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर व्हॉलीबॉल संघटनेचे सी.पी.गुप्ता व एस.ए.वहाब यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील १४, १७ व १९ वर्षाखालील वयोगटातील २८८ मुली सहभागी झाल्या आहेत. प्रारंभी पालकमंत्री बडोले व आमदार अग्रवाल यांनी क्रीडांगणावर खेळाडूंचा परिचय करुन घेतला व खेळाकरीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सहभागी संघातील मुली मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी केले. संचालन विनायक अंजनकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी मानले.