आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप

0
20

शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध देण्याबरोबरच शेती उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी 5 एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असे वर्धा जिल्ह्यात 920 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के रक्कम भरावी लागणार असल्यामुळे कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणने या निर्णयामुळे सुलभ होणार आहे.

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी सौर कृषीपंप देण्याचा महत्त्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत 3.5 किंवा 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषीपंप या योजनेंतर्गत उपलब्ध होतील यासाठी महावितरणतर्फे प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य यानुसार सौरपंपाचे वितरण होणार आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीपर्यंत सिंचन कनेक्शन मिळू शकले नाही अथवा डोंगराळ व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सौर कृषीपंपासाठी पाच एकर पेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राथम्य क्रमानुसार कृषी पंप वितरित करण्यात येणार असून राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी ही योजना आहे, शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत निधीचा लाभ घेतलेले लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण झालेल्या गावातील शेतकरी, वन विभागाने विद्युतीकरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकऱ्यांचे तसेच तांत्रिक अडचणींमुळे महावितरणतर्फे वीजपुरवठा शक्य नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समावेश राहणार आहे. योजनेसाठी लाभार्थी शेतकरी हा जेथे सौर कृषी पंप बसवायचा आहे, त्या शेत जमिनीचा मालक असणे गरजेचे आहे.

पाच एकर पेक्षा अधिक जमिनीचे क्षेत्र नसलेले व शेतात विहिरीला सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेल्या या योजनेस प्राधान्य देण्यात येणार आहे. वैयक्तिक किंवा सामूदायिक शेततळी व विहिरी यासाठी 3 एचपी क्षमतेपर्यंतचे सौरपंप गरजेनुसार देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे तसेच महावितरणतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत असून लाभार्थ्यांना 5 टक्के आपला हिस्सा देणे आवश्यक आहे. 3 अश्व शक्ती सौरपंपासाठी लाभार्थ्यांला 16 हजार 200 रूपये तसेच डीसी पंपासाठी 20 हजार 250 रूपये लाभार्थ्यांचा हिस्सा भरणे आवश्यक आहे. 5 एचपीसाठी पंपासाठी 27 हजार तर डीसी पंपासाठी 33 हजार 750 रूपये लाभार्थ्यांचा हिस्सा राहणार आहे. 30 टक्के अनुदान केंद्र शासनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे वरीष्ठ भूवैज्ञानिक, तर सदस्य सचिव म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता आहेत. शासनाच्या विविध विभागातर्फे विहिरीसाठी अनुदान मिळालेल्या व विहिरी पूर्ण झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांची जिल्ह्यातील यादीनुसार या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्धा जिल्ह्याला 920, बुलढाणा 1 हजार 660, अकोला 1 हजार, अमरावती 1 हजार 700 तसेच यवतमाळ जिल्ह्याला 1 हजार 420 सौर कृषी पंप वितरित करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक

पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 5 एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने घोराड येथे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर कृषि पंपाची प्रत्यक्ष पाहणी करता यावी यासाठी लुबी कंपनीतर्फे प्रथमच प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.

सौर कृषिपंप योजनेचे प्रात्यक्षिक घोराड तसेच समूद्रपूर येथे आयोजित करण्यात आला असून या योजनेंतर्गत 3 अश्वशक्ती पंपासाठी 250 अश्वशक्तीची 12 पॅनेल तसेच पाच अश्वशक्तीसाठी 20 पॅनेल राहणार आहेत. 365 दिवसांपैकी सौरऊर्जेद्वारे 300 दिवस दररोज 8 तास कृषिपंपाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सुविधा उपलब्ध होणार असून सौरपंपाची कालमर्यादा 20-25 वर्ष असल्यामुळे 20 वर्ष वीज देयक भरण्याची आवश्यकता राहणार नाही. 3 अश्व शक्तीसाठी शेतकऱ्यांना 16 हजार 200 रूपये सहभाग भरल्यास 3 लक्ष 24 हजार रूपयांचा 3 अश्वशक्तीचा सोलार पंप उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवून सौरकृषीपंप योजनेत सहभागी होऊन आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन घेतल्यास आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

-अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा.