अदानीची खासगी क्षेत्रात ‘पॉवर’

0
17

तिरोडा (महाराष्ट्र)-चार महिन्यांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सलग दुसरा खरेदी व्यवहार पार पाडत अदानी पॉवर कंपनी ही देशातील सर्वात मोठी खासगी ऊर्जानिर्मिती कंपनी बनली आहे. कंपनीने अवांता समुहाचा ६०० मेगावॅट निर्मिती क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प ४,२०० कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
पश्चिम कोब्रा भागातील हा ऊर्जा प्रकल्प कोळशावर आधारित आहे. नव्या व्यवहार खरेदीमुळे अदानी पॉवर आता ११,०४० मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमता असणारी सर्वात मोठी झाली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्येच अदानी पॉवरने उडिपी येथील १,२०० मेगा वॅटचा ऊर्जा प्रकल्प खरेदी केला होता. कोटय़वधींचे कर्ज असलेल्या लॅन्को इन्फ्राचा हा प्रकल्प त्यावेळी ६,००० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.
अदानी समूहाने २०२० पर्यंत २०,००० मेगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अवांताच्या कोब्रास्थित प्रकल्प खरेदीमुळे अदानी पॉवरला कोळसा खनिकर्म क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याची संधी मिळाली आहे. कोळसा खाणींसाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये होणाऱ्या लिलावानंतर या प्रकल्पाचा लाभ प्रत्यक्षात दिसू लागेल.
अदानी पॉवरच्या अस्तित्वातील सध्याच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची क्षमता ९,२४० मेगावॅट आहे. पैकी सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता प्रकल्प हा गुजरातेतील मुंद्रा येथे आहे, तर महाराष्ट्रातील तिरोडा येथील ३,३०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पासह येथेच आणखी ६६० मेगा वॅट ऊर्जा निर्मिती प्रतीक्षेत आहे. याशिवाय कंपनीचा राजस्थानमध्येही एक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.
अवांता समूहाचा ऊर्जा प्रकल्प खरेदीमुळे अदानी पॉवरचा समभाग सोमवारी भांडवली बाजारात ३ टक्क्य़ांपर्यंत वधारला. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागाला व्यवहारात ३.४१ टक्के अधिक, ४६.९० रुपयेपर्यंतचा भाव मिळाला, तर दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत २.६५ टक्क्य़ांनी उंचावत ४६.५५ रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारातही कंपनी समभाग मूल्य २.४२ टक्क्य़ांनी वधारून ४६.५५ पर्यंत झेपावले
अदानी पॉवरची विद्यमान ऊर्जा निर्मिती क्षमता
मुंद्रा (गुजरात) ४,६२० मेगावॅट
तिरोडा (महाराष्ट्र) ३,३०० मेगावॅट
कवाई (राजस्थान) १,३२० मेगावॅट
एकूण ९,२४० मेगावॅट