खडसेंचा मुक्काम रविभवनातच,बावनकुळे, मुनगंटीवार सख्खे शेजारी

0
9

नागपूर दि.२५:: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या दृष्टीने रविभवन येथील कॉटेजचे वाटप केले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने एकमेकांचे शेजारी असलेले ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर) व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) यांचा रविभवनातील मुक्कामही एकमेकांच्या शेजारीच असणार आहे. मुनगंटीवार यांना कॉटेज क्रमांक ४ तर बावनकुळे यांना कॉटेज क्रमांक ५ मिळाले आहे.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देवगिरीची मागणी केली होती. या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आपणच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १ त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना कॉटेज क्रमांक २, परिवहन मंत्री दिवाकर रावते ३, पर्यावरण मंत्री रामदास कदम ६, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ७, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ८, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील ९, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे १०, उद्योगमंत्री सुभाष देसाई ११, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट १३, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन १४, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर १५, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत १६ व सामाजिक न्यायमंत्री  बडोले यांच्यासाठी कॉटेज क्रमांक २१ आरक्षित ठेवण्यात आले आहे.

अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेबदल झाल्यास रविभवन येथील कॉटेज आरक्षणात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यमंत्र्यांसाठी नागभवन येथील कॉटेज आरक्षित ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या कॉटेज आरक्षणाचा विचार करता यात फारसा बदल झालेला नाही. कॉटेज क्रमांक ५ गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आरक्षित होते. यावेळी येथे चंद्रशेखर बावनकुळे मुक्कामास आहेत.