नागरिक करणार पोलीस मित्रांचे काम

0
26

 गोंदिया दि. २८:: पोलिसांवर दिवसेंदिवस वाढत्या कामाचा ताण लक्षात घेत पोलिसांच्या मदतीसाठी आता पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी घेतला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आता नागरिक पोलीस मित्र म्हणून काम करणार आहेत.
पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास गोंदिया येथील रामनगर पोलीस ठाणे येथे सुरूवात करण्यात आली. २६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यातील आवारात पोलीस मित्र संमेलन घेण्यात आले. या वेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. प्रकाश धोटे, सामाजिक कार्यकर्त्या धर्मिष्ठा सेंगर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविकातून पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस मित्र संमेलनामागची भूमिका विषद केली. पोलिसांना आता नागरिक मदत करणार असल्यामुळे अनेक बाबतीत नागरिकांची पोलीस मित्र म्हणून मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रत्येक माणसाने पोलीस म्हणून काम केले तर गुन्हेगारांवर वचक व सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगितले. संविधान दिनानिमित्त ते पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील एक आदर्श राज्यघटना निर्माण करून देशाला अर्पण केली आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे मानवी हक्क देऊन जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत या कायद्यांचा प्रचार-प्रसार आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, नागरिकांनी पोलिसांना मदत केल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल. अनेक गुन्ह्यांचा शोध घेण्यास पोलीस मित्रांची मदत होईल. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन या संकल्पनेमुळे बदलण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिक कामानिमित्त सहज पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना मदत करेल. 
या वेळी आदेश शर्मा, अँड. अर्चना नंदागळे, आशा नागपुरे, अजय अग्रवाल, दिव्या भगत, सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. ताईतवाले, पी.पी. गराडे व पोलीस उपनिरीक्षक कोकाटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 
कार्यक्रमाला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या विविध प्रभागातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.