नागपूर महापालिकेचे वाहतूक धोरण ‘नंबर 1’

0
12
नागपूर दि. २८: नागपूर महापालिकेने दिल्लीत अर्बन मोबिलिटी प्रदर्शनात सादर केलेल्या वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक मिळाला. ग्रीन बसवर आधारित धोरणाचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केंद्रीय नगर विकास विभागातील अधिकारी तसेच जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींपुढे केले. उत्तम वाहतूक धोरणाच्या स्पर्धेत देशातील 40 महापालिकांचा समावेश होता. आता नागपूर महापालिकेच्या धोरणाचे सादरीकरण वॉशिंग्टनमध्ये होणार असल्याचे मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत ग्रीन सिटी, क्‍लीन सिटीसह अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या महापालिकेच्या शिरपेचात आज आणखी एक तुरा रोवला गेला. केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे दिल्लीत आयोजित अर्बन मोबिलिटी प्रदर्शनात शुक्रवारी शेवटच्या दिवशी महापालिकेच्या वाहतुकीच्या धोरणाचे सादरीकरण करण्यात आले. नागपूर महापालिकेने ग्रीन बस शहरात चालविण्यासंदर्भात धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करताना वाहतूक व्यवस्थापनात पारदर्शकता यावी, यासाठी तीन वेगवेगळ्या निविदा काढण्याचे प्रस्तावित आहे.नागपूर महापालिकेचे हे नवे धोरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाणार आहे. या धोरणाबाबत माहिती व सादरीकरणासाठी वॉशिंग्टनचे आमंत्रण असल्याचे मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.