कृषी सहायकाने लाखोंची औषधी जंगल शिवारात फेकली

0
18

अर्जुनी-मोरगाव,दि.29- तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची औषधी शेतकऱ्यांना वाटप न करता कृषी सहायक औरासे व कृषीमित्र सुदाम कोवे यांनी जंगल शिवारात बेवारस फेकून दिली. बीट क्रमांक ८५२ मध्ये घडलेल्या या अफलातून प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सरपंच मनिषा साखरे यांनी फेकलेल्या औषधीचा पंचनामा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीविषयक चांगल्या योजना राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्य न बजावता शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करीत असतात. अरततोंडी/परसटोला येथे घडलेला प्रकार अशाच प्रकारामधील आहे.