परिश्रमातूनच यशाचा मार्ग सापडतो – सुधीर मुनगंटीवार

0
14

वर्धा : स्‍पर्धा परीक्षांच्‍या माध्‍यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची जोड दिली तरच आपण यशस्‍वी होऊ शकतो, असा सल्‍ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

वर्धा येथील जिल्‍हा शासकीय ग्रंथालयात स्‍पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण योजनेमध्‍ये 1 कोटी 70 लक्ष रुपयांच्‍या निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल बिरसा मुंडा फाऊंडेशन यांच्यातर्फे पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर व जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्‍पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्‍यासाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल त्‍यांचेही आभार फाऊंडेशनने व्‍यक्‍त केले.

विश्रामगृहाच्‍या परिसरात आयोजित या कार्यक्रमात बोलताना श्री.मुनगंटीवार म्‍हणाले, लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यातील तरुणांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध होत नसल्‍याबद्दल मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्‍यक्षतेखाली समिती नियुक्‍त केली होती. या समितीच्‍या माध्‍यमातून विदर्भ मराठवाड्यातील लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्‍या नोकऱ्‍यांमध्‍ये या भागातील भरती होते किंवा काय यासंदर्भात सखोल अभ्‍यास केल्‍यानंतर या संदर्भातील शासन निर्णय काढण्‍यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

जिल्‍हा नियोजन समितीच्या निधीमधून 1 कोटी 70 लक्ष रुपयांची तरतूद शासकीय जिल्‍हा ग्रंथालयासाठी करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सुसज्ज अशी अभ्यासिका, स्‍पर्धा परिक्षेसाठी उपयुक्‍त अशी पुस्‍तके उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. या कार्यक्रमास आमदार डॉ.भोयर व जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांचा सत्‍कार फाऊंडेशनतर्फे करण्‍यात आला. यावेळी आमदार सुधीर कुणावार यांचीही उपस्थिती होती.