लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री बडोले

0
25

सडक/अर्जुनी तालुका आढावा बैठक
गोंदिया,दि.30 : तालुक्यातील विविध विकास कामे करतांना लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
२९ डिसेंबर रोजी सडक/अर्जुनी तहसिल कार्यालयात तालुका आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विकास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री गंगाधर परशुरामकर, माधुरी पातोडे, शिला चव्हाण, रमेश चुऱ्हे, पंचायत समिती सदस्य सर्वश्री राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, श्रीमती परशुरामकर, श्रीमती इरले, श्रीमती भोयर, श्रीमती टेंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता धान पिकाकडून नगदी पिकाकडे वळले पाहिजे. कृषी विभागाकडून करण्यात येणाऱ्या विविध प्रात्यक्षिक प्रयोगाचा उपयोग शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्यासाठी करावा. तालुक्यातील ५० ते १०० शेतकऱ्यांना कृषि विभागाने पश्चिम महाराष्ट्रात शेती बघण्यासाठी न्यावे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पीक पद्धतीत बदल करतील आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल. खऱ्या अर्थाने जे शेतकरी शेतीत मेहनत व परिश्रम करतील अशाच शेतकऱ्यांची कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड करण्यात यावी. त्यामुळे त्याचे दृश्य परिणाम शेतीतून दिसून येईल व त्यांचे अनुकरण इतर शेतकरी करतील.
सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या विभागाच्या अधिनस्त असलेल्या महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात येईल. त्यामुळे विविध योजनांचा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव आणि देवरी येथे वसतीगृह सुरु करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील अनेक युवक-युवतींना देण्यात येत असून त्यांचे शिक्षण, नोकरी व स्वावलंबनासाठी या योजना उपयुक्त ठरत आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत आणखी नाविन्यपूर्ण काही योजना सुरु करण्यात येणार असल्याचे श्री.बडोले यांनी यावेळी सांगितले.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेअंतर्गत येणाऱ्या घटकांना त्यामुळे दिलासा मिळण्यास मदत होईल. मुद्रा योजनेसह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करुन पालकमंत्री बडोले म्हणाले, तालुक्यातील अनेक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी नियोजन करुन दुरुस्ती करावी. वीज वितरण कंपनीने प्रत्येक फिडरसाठी समित्या गठीत कराव्यात व शासन निर्णयानुसार बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्याची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना कृषी पंपांचे चुकीचे बीले देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, ज्या गावातील शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र जवळचे आहे अशाच केंद्राला जवळचे गावे जोडावी त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल यासाठी संबंधित ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाने लक्ष देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
श्रीमती गहाणे यांनी तालुक्यातील सरपंच व सचिवांना आवाहन करुन केंद्र सरकारच्या सुकन्या योजनेचा लाभ तालुक्यातील मुलींना देण्यात येण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क करण्याचे सांगितले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपल्या गावातील समस्या यावेळी पालकमंत्र्यांपूढे मांडल्या. समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री.खर्चे, तहसिलदार श्री.परळीकर, प्रभारी गटविकास अधिकारी श्री.टेंभरे यांचेसह उपविभागातील व तालुकास्तरीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.