विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे नेतृत्व : वेकोलिच्या धोरणाविरोधात धरणे

0
17

चंद्रपूर : पायली, भटाळी, किटाळी, सिनाळा, मसाळा, नवेगाव, तिरवंजा येथील कोळसा खाणीकरिता वेकोलिने शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पग्रस्तांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. प्रकल्पग्रस्तांचा दीडशे कोटीहून अधिक मोबदला अडवून ठेवला, विस्थापित सर्वसामान्यांचे सानुग्रह अनुदानही दिले नाही. वेकोलिच्या या धोरणाविरोधात आज शनिवारी येथील गांधी चौकात धरणे देण्यात आले. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
पायली, भटाळी, किटाळी, सिनाळा, मसाळा, नवेगाव, तिरवंजा व इतर कोळसा खाणीकरिता वेकोलिने शेतकर्‍यांच्या जमिनी आठ वर्षांपासून संपादित केल्या आहेत. वेकोलिने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला वेळेत देणे बंधनकारक आहे. वेकोलिने १८ महिन्यांपूर्वी व ११ महिन्यांपूर्वी मोबदल्याची रक्कम प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त देण्याबाबत करारनामे केले आहेत. असे असतानाही वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात टाळाटाळ करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी वारंवार वेकोलिच्या अधिकार्‍यांना भेटून मोबदला, नोकरी व इतर मिळणारा लाभ देण्याची विनंती केली. मात्र वेकोलि प्रशासन आपली मनमानी करीत आहेत. वेकोलिने एकतर करारनामा रद्द करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा, या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी ११ वाजतापासून गांधी चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.