आत्मशांती, विरंगुळा व आनंदासाठी वाचन अवश्य करावे – के.एन.के.राव

0
22

ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा समारोप
गोंदिया, ३१ : ग्रंथ स्वयंपूर्ण असतात. ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे माणूस भीतीमुक्त होतो व अज्ञानी माणूस मात्र सतत भीतीच्या छायेत वावरतो. जीवनात आत्मशांती, विरंगुळा व भयमुक्ततेसाठी वाचन अवश्य करावे. असे प्रतिपादन गोंदियाचे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी श्री शारदा वाचनालय येथे आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय भाषणात केले. यावेळी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून गोंदियाचे तहसिलदार संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज.सू.पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे खुमेंद्र बोपचे, जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, शरद काथोडे व श्री शारदा वाचनालयाच्या श्रीमती ढोमणे उपस्थित होते.
पुढे बोलतांना राव म्हणाले, माणूस जे बोलतो ते त्याचे विचार असतात. पंरतू प्रगल्भ वाचनामुळे मनूष्य आपले मत बनवू शकतो. आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो. स्वामी विवेकानंदाच्या प्रभावी लेखनाविषयी सांगताना, आत्मविश्वासासाठी वाचन करावे असे ते म्हणाले. निरंतर वाचनातून काय वाचावे हेही मनुष्याला उमगत जाते. ग्रंथ हे आत्मसन्मानासाठी पात्र ठरवणारे मनुष्याचे खरे मित्र आहे. म्हणून ग्रंथाशी जवळीकता वाढवा. असे उपस्थित युवक-युवतींना त्यांनी सांगितले.
संजय पवार म्हणाले, ग्रंथवाचन म्हणजे बुध्दीजीवांची मक्तेदारी राहू नये. वाचनाने संस्कृतीची जोपासना व संवर्धन होते. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी. अवांतर वाचनातून जागृत झालेली ज्ञानाची भूक वैचारीक, मार्मिक व चिंतनशील वाचनाने शमते. या अवस्थेपर्यंत जो पोहोचला तो पूर्णत्वाकडे वळला. असे म्हणावयास पाहिजे.
मोटघरे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रमाणात वाढला आहे. त्याच प्रमाणात युवकांनी ग्रंथवाचनाकडे वळणे गरजेचे आहे. शरद काथोडे यांनी समाजामध्ये ग्रंथालयाची भूमिका ज्ञानमंदिराची असल्याची सांगून ज्ञानाचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचविण्याचे ते उत्कृष्ट साधन आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना खुमेंद्र बोपचे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या आयोजनामुळे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानीचा आस्वाद घेता आला. असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विद्या ठाकूर हिने केले तर आभार पूजा सोनजल हिने मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.