आदिवासींनी योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा- विष्णू सवरा

0
27

वर्धा : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. शिक्षण, प्रशिक्षण, उद्योजकातून स्वतःबरोबरच समाजाचा विकासही साधावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.

वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्यावतीने आयोजित आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुल येथे 52 फूट सल्ला गांगरा आदिवासी शक्ती स्थळाच्या लोकार्पण व वर-वधू परिचय मेळाव्यात श्री. सवरा बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार दत्ता मेघे, वासुदेवशहा टेकाम, बापूराव उईके पाटील, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, समितीचे अध्यक्ष राजूभाऊ मडावी, अवचितराव सयाम आदी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, वर्धा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु आमदार डॉ. भोयर यांच्या अथक पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य केली आहे. तत्काळ जिल्ह्यात या कार्यालयाची सुरूवात करण्यात येईल. कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना उपयुक्त असणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी मदतच होणार आहे. समाजगृह उभारणीसाठी प्रयत्नही करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.