शिरपूर पॅटर्न महाराष्ट्राच्या विकासाचा मूलमंत्र- सुरेश खानापूरकर

0
47

चंद्रपूर : महाराष्ट्रात दिवसांगनिक पाण्याचा दुष्काळ वारंवार निर्माण होत असून यामुळे विविध समस्या तयार होत आहे. याचाच परिणाम नापिकी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे चित्र दिसून येते. महाराष्ट्राचा खरा विकास करायचा असेल तर राज्यातील प्रत्येक भूभागात पुरेसे पाणी निर्माण करण्याची गरज असून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेकडे नेण्याकरीता शिरपूर पॅटर्न विकासाचा मूलमंत्र ठरेल, असे प्रतिपादन सुरेश खानापूरकर यांनी आयोजित जलपरिषदेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

विविध भूभागात पाण्याचा दुष्काळ असल्याचे समजते. श्री.खानापूरकर यांच्या मते आजही पाऊस सरासरी पूर्वी इतकाच पडत असून कुठेही पाऊसाचे प्रमाण कमी झालेले नाही. फक्त पावसाचे दिवस कमी झालेले आहे. पाऊस पडला की पाणी वाहून जाणे. पावसाचे पाणी अडवून जिरवण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे मानवाने स्वत:हून पाण्याचा दुष्काळ निर्माण केला आहे. ज्या भागात पाऊस पडला त्या भागात सुध्दा तीन महिने गेले की पाण्याची भीषण समस्या जाणवते. अर्थातच अशा भूभागात पाणी अडवण्याचे व जिरवण्याचे प्रमाण कमी आहे. पावसाचे पाणी अडविणे व ते जिरविण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करणे काळाची गरज आहे. भूगर्भातील कोसोदूर असलेले पाणी निव्वळ उपसण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जंगलामुळे पाऊस पडत असतो पण जंगलाची घनता कमी कमी होत आहे. धरणाचे पाणी सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्याकरिता नियोजन करावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जलसंधारणाची कामे योग्य तांत्रीक पद्धतीने केल्यास खरा गावांचा विकास साधता येईल. पाण्याच्या उगमापासून तर संगमापर्यंत पाणी जमेल तेथे अडविणे व जिरवले पाहिजे. पाणी दगडातून, मातीतून मिळत असते. हे तंत्र प्रत्येकाने अवगत केले पाहिजे. मुरुमाचा थर म्हणजे पाण्याचे घर या म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांनी मुरमाड जमिनीत पाणी अधिक प्रमाणात जिरवावे. उथळ झालेल्या नाल्याला खोल करावे व मिळेल त्या साधनांनी पाणी जिरवावे. पाणी अडविण्याच्या, पाणी जिरवण्याच्या उपाययोजना श्री.खानापूरकर यांनी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय हे व्याख्यान जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पूर्णवेळ ऐकून घेतले.