शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

0
10

मुंबई : राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्त्याचा दर 113 टक्क्यांवरुन 119 टक्के एवढा झाला आहे.

याबाबतचा शासन निर्णय आज दि. 5 फेब्रुवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 1 जुलै, 2015 पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 113 टक्के वरुन 119 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी, 2016 पासून या महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे. 1 जुलै, 2015 ते 31 जानेवारी 2016 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या आहरणाबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहिल. सदर आदेश सुधारित वेतनसंरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.

हा निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201602051308291805 असा आहे.