शहरी संघटनांचा नक्षलवाद रोखणे आवश्यक -विशेष पोलिस महानिरीक्षक बोडखे

0
14

 

 नक्षल विरोधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन
 राज्यातील नक्षल सेल मधील पोलिस अधिकारी-कर्मचा-यांचा सहभाग

नागपूर, दि. ९ – नक्षलवाद हा केवळ दुर्गम व घनदाट जंगल भागापुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा प्रवेश अदृष्य स्वरूपात शहरी भागात होत आहे. विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शहरी भागातील तरूणांना आपल्या जाळ्यात घेऊन लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वेळीच सतर्क होऊन नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी-कर्मचा-यांनी दक्ष राहून योग्य कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी आज येथे केले.
विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, नक्षल विरोधी अभियान व अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रांच्या सभागृहात आयोजित ‘नक्षल विरोधी प्रशिक्षणङ्क या चार दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शमशेर सिंग, नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस उपअधिक्षक श्री. संजीव म्हैसेकर, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. बोडखे म्हणाले, राज्यातील पोलिस ठाण्यात नक्षल सेल सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यांचे नाव समोर येताच नक्षलवाद हे चित्र डोळ्यापुढे येते. मात्र या जिल्ह्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सेवा देणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी नक्षलवाद या विषयाशी अनभिज्ञ असतात. अशातच सध्याच्या परिस्थितीत विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शहरी भागात हा नक्षलवाद प्रवेश करू पाहत आहे. त्यामुळे नक्षलवादाची संपुर्ण माहिती तसेच शहरी भागात नक्षलवादाला आळा घालण्यासाठी भविष्यात कसे कार्य करावे, याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनमधील माओवाद, रशियामधील साम्यवाद व लेनिनवादाचा प्रभाव फार पुर्वीपासून भारतात दिसून येत आहे. नक्षल्यांनी माओ व लेनिन ही विचारसणी घेऊन भारतातील लोकशाही व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांचे प्रस्थ वाढविण्यासाठी युवक वर्गाला आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले आहे. याला चळवळीचे नाव देऊन प्रशासकीय व्यवस्था कमजोर करणे तसेच पोलिस व्यवस्थेवरून विविध आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. त्यासाठी हे नक्षलवादी स्थानिक समस्यांना पुढे करून समाजाला प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द भडकविण्याचे कार्य करीत आहेत.दुर्गम व जंगली भागात दृष्य स्वरूपात नक्षलवाद असल्यामुळे त्याच्याशी पोलिस यंत्रणेचा लढा सुरू आहे. मात्र फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या स्वरूपात ही चळवळ आपले पाळेमुळे शहरी भागात खोलवर रूजविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा नक्षलवाद अदृष्य स्वरूपाचा असल्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विविध एनजीओ सारख्या संघटनांमध्ये नक्षलवादाचा होणारा शिरकाव ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. बोडखे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. बोडखे यांच्या हस्ते विशेष माहिती व जनसंपर्क कक्ष, नक्षल विरोधी अभियान यांच्याद्वारे तयार केलेल्या ‘नक्षलवाद आणि सद्यास्थितीची आव्हानेङ्क माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे पोलिस निरीक्षक (प्रशिक्षण) श्री. डी.एन. ढवळे यांनी केले. यावेळी नक्षल विरोधी अभियानाचे सहायक पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, मनोज बहुरे, प्रशासन अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक अशोक रूपनारायण, ए.बी. मंडल यांच्यासह राज्यातील नक्षल सेलमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.