तायवाडेंनी सामान्यांसाठी लढत असामान्यत्व मिळविले

0
6

नागपूर : धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांचे आयुष्य संघर्षरत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल विकले, ट्युशन क्लासेस घेतले. कामाची लाज बाळगली नाही. परिश्रमातून यशाचा एक एक टप्पा गाठला. ते मित्र व माणसांशिवाय राहू शकत नाही. कुशल संघटक असलेले तायवाडे यांनी नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड केली. त्यामुळेच त्यांना असामान्यत्व मिळाले, अशा शब्दात मान्यवरांनी डॉ. बबनराव तायवाडे यांचा गौरव करीत त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची पावती दिली.
डॉ. बबनराव तायवाडे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारोह रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात पार पडला. अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके होते. मंचावर आयोजन समितीचे प्रमुख गिरीश गांधी, अनंतराव घारड, आ. सुनील केदार, आ. प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, अनिल अहीरकर, महाराष्ट्र कॉर्मस टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष टी.ए. शिवारे, बलविंदर सिंग, माजी आ. दीनानाथ पडोळे, डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. बबनराव तायवाडे व पत्नी डॉ. शरयू तायवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, ६0 किलो वजनांचा पुष्पहार, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रमेश बोरकुटे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला मातोश्री लीलाताई तायवाडे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.