नागपूर विद्यापीठामध्ये लवकरच सर्वज्ञ चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राची निर्मिती – मुख्यमंत्री

0
15

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या नावाचे अध्यासन केंद्राची निर्मिती लवकरच करण्यात येईल. या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे महानुभावपंथी यांचे ‘काशी’ असणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महानुभाव सेवा संघाच्यावतीने देशपांडे सभागृहात दोन दिवसीय महानुभाव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नागराजबाबाशास्त्री, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कारंजेकरबाबा, मार्गदर्शक बिडकरबाबाशास्त्री, माहुरकरबाबाशास्त्री, युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, स्वागत समितीचे अध्यक्ष तु.वि.गेडाम तसेच आचार्य, महानुभाव साहित्याचे संशोधक, अभ्यासक आणि महानुभाव धर्मपंथीय नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तु.वि. गेडाम म्हणाले, महानुभाव पंथ हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक जीवनाला नवे आयाम प्राप्त करुन देणारा प्रेरणादायी पंथ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांनी 12व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव (परमार्ग) पंथाची स्थापना केली. आणि आपल्या तत्त्वज्ञानातून जनसामान्यांच्या जीवनाला मूल्याधिष्ठित वळण लावले. समाजात रुढ असलेल्या अनिष्ट धार्मिक रुढी नाकारुन त्यांनी सर्वजाती वर्गातील स्त्री-पुरुषांना पंथात प्रवेश देऊन आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. महानुभाव पंथ काबुल, कंदहारपर्यंत पोहचला आहे. पंथाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृतीही सर्वदूर पोहचली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.