मध्य भारत, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रादेशिक क्रीडा संकुलामुळे नव्या संधी- मुख्यमंत्री

0
18

नागपूर : भारतीय खेळ प्राधिकरणाच्या नागपुरात होणाऱ्या प्रादेशिक खेळ केंद्रामुळे मध्य भारत व महाराष्ट्रातील खेळाडूंना सुवर्ण संधी मिळेल. याबरोबरच नागपूरच्या सामाजिक जीवनातही आमुलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेतर्फे भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रादेशिक खेळ केंद्रासाठी ‘भूमी हस्तांतरण समारंभ’ आज कळमना मार्केट रोड येथील ‘नैवेद्यम इस्टोरिया’ येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री सर्बानंदा सोनोवाल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे ,आशिष देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे सभापती सुधीर राऊत, मनपाचे पक्षनेते दयाशंकर तिवारी, केरळचे मुख्य सचिव जीजी थॉमसन, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव ओंकार केडिया, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू करण्याच्या हेतूने कार्यरत स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) देशातील सर्वात मोठ्या प्रादेशिक केंद्रासाठी भूमी हस्तांतरण तसेच शिलान्यास समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाठोडा येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्री.सोनोवाल यांच्या हस्ते शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेने भारतीय खेळ प्रादेशिक केंद्रासाठी 141 एकर जागा देऊ केली आहे. यामुळे मुंबई, औरंगाबादच्या उपकेंद्रासह संपूर्ण महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेली येथील केंद्र नागपूर केंद्राच्या अधिपत्याखाली येणार आहे.
भारतीय खेळ प्राधिकरण प्रादेशिक केंद्रास पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्री.सोनोवाल यांनी केली. यावेळी आमदार श्री.खोपडे, केरळचे मुख्य सचिव श्री. थॉमसन यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी यांनी केले.