अमरावतीची ओळख टेक्स्टाईल सिटी म्हणून होणार- मुख्यमंत्री

0
19

अमरावती : अमरावतीतील नांदगाव पेठ एमआयडीसी क्षेत्रात स्थापित टेक्स्टाईल पार्कमध्ये रेमंडसारखा जागतिक दर्जाचा ब्रान्ड आल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील अन्य नामांकित कंपन्यांची पावले येथे वळत आहेत. येत्या चार वर्षांत अमरावतीची ओळख टेक्स्टाईल सिटी म्हणून होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

रेमंडच्या नांदगाव पेठ येथील मल्टीस्पेशालिटी टेक्स्टाईल व गारमेंट निर्माण युनिटच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, सर्वश्री आमदार डॉ.सुनिल देशमुख, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, डॉ.अनिल बोंडे, आशिष देशमुख, आमदार ॲड.यशोमती ठाकूर, महापौर चरणजित कौर नंदा, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, जिल्हाधिकारी किरण गित्ते, श्याम इंडो फॅबचे श्याम गुप्ता आदी उपस्थित होते.

फेब्रुवारी महिन्यात मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झालेल्या रेमंड कंपनीचे आज एप्रिलमध्ये भूमिपूजन करताना आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. श्री. सिंघानिया म्हणाले, महाराष्ट्रात 8 ठिकाणी रेमंडचे युनिट असून 10 हजाराहून जास्त लोकांना रोजगार रेमंडनी दिला आहे. विदर्भात यवतमाळ येथे 1995 मध्ये सुरु केलेल्या डेनिम फॅब्रिक कंपनीने 2500 हून अधिक लोकांना रोजगार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. नांदगाव पेठमधील या उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 1400 कोटी रुपयाच्या भांडवल गुंतवणुकीसह 8 हजाराहून अधिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध होतील व मार्चअखेर उत्पादन सुरु होईल असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने गतीमान पद्धतीने केलेल्या कामामुळेच दोन महिन्यात प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकले. सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.