‘सैराट’ची गाडी सुसाट

0
30

प्रेक्षागृहाबाहेर पडल्यावरही मनात रेंगाळेल तो सर्वोत्तम सिनेमा. ‘सैराट’ची सुसाट निघालेली गाडी थेट प्रेक्षकांच्या मनात पार्क होते. जातीव्यवस्थेच्या भीषण वास्तवापासून लांब असलेल्या शहरी जनतेच्या आत्म्याला पिळवटून टाकण्याची ताकद सैराटमध्ये आहे. निखळ अन अतुट प्रेम करणारे परशा आणि आर्ची खूप काळ स्मरणात राहतील. सिनेमाचा निराळा प्रयोग दाखवत नागराज मंजुळे यांनी नवा पायंडा प्रस्थापित केला यात शंका नाही.

सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला ‘सैराट’ प्रदर्शनानंतरही चर्चेतच राहील. ग्रामीण जीवनाच्या किंबहुना भारतीय जनतेच्या मुळाशी घट्टपणे बांधलेली जातीव्यवस्थेची मुळ किती दाहक आहेत, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. विचारशक्तीच नष्ट करणाऱ्या ग्लॅमरस सिनेमांमध्ये भारतीय समाज गुरफटून गेला आहे. त्याला वास्तवाचे भान आणताना सिनेमा म्हणून उत्तम कलाकृती देण्याचा मंजुळेंचा प्रयत्न १०० टक्के यशस्वी ठरला आहे.

ग्रामीण बाज म्हणजे कोल्हापुरी ठेका, हे समीकरण मोडीत काढून सोलापूर, नगर भागातील ग्रामीण लहेजा आनंद देणारा आहे. बिग बजेट सिनेमात परदेशात जाऊन केलेल्या चित्रिकरणांवर पुर्णपणे मात करेल असे गावातील निखळ सौंदर्य, आटपाट नगर यामध्ये पाहायला मिळते. दमदार विषयाचे सौंदर्य पटकथेतून अधिक चमत्कृतीने मांडले आहे. सिनेमातील प्रत्येक कलावंत नायक आहे. प्रत्येकाची भूमिका दाद मिळवते. मात्र, मध्यांतरानंतरचा सिनेमा काहीसा हळूवार पावलांनी पूढे सरकतो. तरीही शेवटी जबरदस्त आहे.

गरीब-श्रीमंत अशी दरी, जातीचा पगडा, प्रतिष्ठा, सत्तेचा माज याला न जुमानता आड वयातील प्रेमाने स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करण्याची हिंमत म्हणजेच ‘सैराट’. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही घडणाऱ्या अशा घटनांचं परशा आणि आर्चीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारी कथा ‘सैराट’मध्ये उलगडते आणि समाजव्यवस्थेचं एक अंग पुन्हा एकदा धगधगू लागतं.