काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाचा उत्साह

0
10

श्रीनगर/रांची – जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. काश्मीर,झारखंडमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
झारखंडमध्ये पाच वाजेपर्यंत ५९.३१ टक्के मतदानाची नोंदझाली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्येही दुपारी दोनपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील १६ जागांसाठी तर झारखंडमधील १७ जागांसाठी मतदान होत आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रावर कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मतदानाच्या या तिस-या टप्प्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांसह १४४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
बडगाव, फुलवामा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील १६ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीतही मतदान केंद्राबाहेर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
आज होत असलेल्या मतदानात १३.६९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६.५१ लाख महिला मतदार आहेत. या भागात एक हजार ७८१ मतदान केंद्रे आहेत.या निवडणुकीत सुमारे १४४ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि दहा आमदारांचा यामध्ये समावेश आहे.
झारखंडमध्ये तिस-या टप्प्यातील मतदान सुरु
झारखंडमधील १७ जागांसाठी तिस-या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून ११ वाजेपर्यंत ३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
झारखंडमधील ५० लाख १६ हजार ६५७ मतदार २८९ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. यामध्ये २३ लाख ५५ हजार ७२८ महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या रिंगणात २६ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या झारंखडमध्ये मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या भागात एक हजार ९५७ केंद्रे ही नक्षलग्रस्त भागात आहेत. तर एक हजार ४७७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. १४ मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया तीन वाजता संपेल. तर रांची, हातिया आणि कनके या मतदारंसंघातील मतदान पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.