१ लाख ९० हजार हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवड

0
17

ङ्घ कृषि निविष्ठा तपासणीसाठी ९ भरारी पथके
ङ्घ ६० हजार ७०० मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर
ङ्घ तक्रारीसाठी ०७१८२-२३०२०८ टोल फ्री नंबर
गोंदिया,दि.३१ : जिल्ह्यात खरीप पीक हंगाम २०१६ अंतर्गत कृषि विभागाने १ लक्ष ९० हजार हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जात असल्याने विविध वाणाचे ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि खाजगी कंपनीकडून १४ हजार ५० क्विंटलचा पुरवठा पुढील प्रमाणे नियोजित आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत रासायनिक खताचे ८२६, बियाणेचे ४९९ व किटकनाशकाचे ४५३ नोंदणीकृत परवानाधारक कृषि निविष्ठा विक्री केंद्र कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रतिचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ गुण नियंत्रण निरिक्षक कार्यरत असून जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक व तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ८ असे एकूण ९ भरारी पथके व सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्हा व तालुका स्तरावर व्यापक प्रमाणात कृषि केंद्राची तपासणी करणे तथा कृषि निविष्ठाची गुणवत्ता तपासणी तथा कोणतेही गैरप्रकार आढळून आल्यास कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१६ करीता शासनाकडून ६० हजार ७०० मे.टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुका निहाय कृषि केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून प्रयोगशाळेला पाठविण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी १८ मे रोजी कला कृषि निविष्ठा उत्पादन आणि विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेऊन कृषि निविष्ठा पुरवठा आणि विक्रीबाबत योग्य मार्गदर्शन करुन निर्देश दिले आहे.
शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा संबंधित कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी व कृषि विभाग पंचायत समिती तथा जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. शिवाय टोल फ्री क्रमांक ०७१८२-२३०२०८ यावर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करतेवेळी अधिकृत कंपनीचे व अधिकृत कृषि केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या निविष्ठाचे पक्के बील घ्यावे. बॅग/कंटेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त रक्कम अदा करु नये. याबाबत कोणतीही तक्रार असल्यास ०७१८२-२३०२०८ या क्रमांकावर किंवा कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन जि.प.च्या कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.