पालकमंत्र्यासह चार मंत्र्यांकडून जखमींची विचारपूस;एअर अॅब्म्युलन्स तैनात

0
16

वर्धा : पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागून स्फोट झाला. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि जिल्हा प्रशासनाकडून घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली.

जखमींना मुंबई येथे हलविण्याची गरज पडली तर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने एअर अॅम्ब्यूलन्सची सोय करुन ठेवली आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. दरम्यान सावंगी मेघे येथील रुग्णालयात जाऊन चारही मंत्रीमहोदयांनी जखमींची व त्यांच्या कुंटूबियांची भेट घेतली. शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास दिला.

हा स्फोट दुदैर्वी असून या भयंकर स्फोटामुळे प्राणहानी व वित्तहानी झाली. काही जण जखमी झाले. पुलगाव परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक माहिती देताना पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार म्हणाले, स्फोटाची माहिती मिळताच राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. अग्निशमनचे बंब, वैद्यकीय सुविधा याबरोबरच परिसरातील लोकांची निवासव्यवस्था तातडीने करण्यात आली.

या स्फोटामुळे ज्या गावाचे किंवा व्यक्तीचे नुकसान झाले असेल त्यांना योग्य ती मदत केली जाईल. आता परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही मंत्रीमहोदयांनी केले. यावेळी खासदार रामदास तडस माजी खासदार दत्ता मेघे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.