पुलगाव सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात;पाच गावातील नागरिकांना हलविले

0
22

वर्धा : पुलगाव येथील मध्यवर्ती दारुगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) काल मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आजूबाजूच्या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीची माहिती कळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल सकाळी पाच पासून घटनास्थळावर उपस्थित होते. 

घटनेची देवळी तहसीलदारांकडून माहिती प्राप्त होताच आग आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यासह नागपूर व यवतमाळचे अग्णीशामक वाहने तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले. कॅम्पमधील सेना अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनाच्यावतीने पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका व अग्निशामक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे व महात्मा गांधी वैद्यकिय महाविद्यालय, सेवाग्राम यांच्याशी संपर्क साधून पुरेशाप्रमाणात रुग्णवाहिका व प्राथमिक वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन दिली. 

स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीमुळे आजुबाजुच्या पाच गावातील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुरदगाव, आगरगाव, यसगाव, नागझरी व पिंपरी या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने देवळी येथील नगर परिषद शाळा व डिगडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. नागरी वस्तीमध्ये सदर स्पोट व आगीमुळे कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही. सदर विस्थापिकांच्या कॅम्पलाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन पाहणी केली.