ड्रायपोर्टसाठी नवे रेल्वे महामंडळ केंद्र सरकारचे पाऊल- गडकरी

0
14

नवी दिल्ली – मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील प्रस्तावित ड्राय पोर्टसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. जलमार्ग वाहतुकीवर भर देण्यात येणार असून त्यासंदर्भातील विधेयकात नदी जोडणीसाठी जहाज मंत्रालयाला जास्तीचे अधिकार देण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

इंडो – अमेरिकन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, देशातील बंदरांचा विकास करण्यावर केंद्राचा भर राहील. दोन ड्राय पोर्ट उभे करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यातील एक मराठवाड्यातील औरंगाबादेत तर दुसरे विदर्भात होणार आहे. तेथील मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.

ड्राय पोर्ट म्हणजे काय?
समुद्र किना-यावरील बंदरांमध्ये असणा-या सोयी-सुविधायुक्त परंतु पठारी प्रदेशातील बंदर म्हणजे ड्राय पोर्ट. प्रस्तावित ड्राय पोर्टमध्ये कंटेनर यार्ड, गोदामे, कंटेनर लिफ्टिंग, ट्रक टर्मिनस या सुविधा असतील. समुद्रकिनारी असणा-या बंदराप्रमाणे ड्राय पोर्टमध्ये कस्टमची पूर्ण प्रक्रिया होईल.

स्वतंत्र लाेहमार्ग
औरंगाबाद-जालना ड्राय पोर्टमधील मालाची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र लोहमार्ग टाकण्यात येणार असून त्या दृष्टीने स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.