हिवाळी अधिवेशनावर पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा माेर्चा-खा.पटेल

0
15

अमरावती,दि.30- राज्यातीलभाजप सरकारच्या विरोधात नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा १२ डिसेंबर रोजी पवार यांचा वाढदिवस शेतकरी परिषद घेऊन नागपुरात साजरा करण्यात येणार असल्याचेही राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्ताने खा.प्रफुल पटेल अमरावती आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणूस सुखी नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या पैकी कोणतीही समस्या सुटलेली नाही. सामान्य जनतेमध्ये भाजप सरकारविरोधात असंतोष वाढतच आहे. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, भाजप सत्तेत आल्यास शेतमालाचे दर दुप्पट होतील, नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. मात्र, आजही जैसे थे परिस्थिती आहे. उलट शेतमालाचे दर कमी होत आहेत, असा आरोप पटेल यांनी केला. विदर्भातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणीही पटेल यांनी केली.