पशुधन विमा पंधरवडा राबविणार- मा. जानकर

0
24

मुंबई, दि. 30 : राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी या योजनेचा फार मोठा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत देशी, संकरीत (गायी,म्हशी), पाळीव पशु (घोडे, गाढव, वळू, बैल व रेडे) तसेच, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यापुढे मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनासाठी विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.

योजनेंतर्गत लाभ देणेसाठी जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 गाय, म्हशी या मोठ्या जनावरांचा अथवा 50 शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किंमतीवर आधारित असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पादनांवर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत निश्चित करण्यात येते. विमा रक्कमेच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनातर्फे भरण्यात येईल. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 70 टक्के पर्यंत शासनातर्फे अनुदान देण्यात येईल. उर्वरित 30 टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील लाभार्थ्यांना 10 टक्के अधिकचे अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.