खोसेटोल्यात जलयुक्तच्या 23 शेततळीमुळे 80 हेक्टरला सिंचनाची सोय

0
9

यशोगाथा

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.4-राज्यसरकारने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला खरे यश जिल्ह्यात मिळू लागले आहे.गेल्या एक वर्षात जिल्ह्यातील जलयुक्तच्या शेततळ्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झालेली असतानाच गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला या गावाने 23 शेततळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तयार करुन एक नवा आदर्श जिल्हावासियांसमोर ठेवला आहे.गोरेगावचे तालुका कृषी अधिकारी आणि तहसिलदारांचे यशस्वी समन्वय हे या गावाला मोलाचे ठरले आहे.या 23 शेततळ्यातून सुमारे 80 हेक्टर सरक्षिंत शेती सिंचनाखाली आली आहे.
राज्यात येत्या पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राज्यात या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. लोकसहभागातून कामे होत आहे. नैसर्गीक स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात हे अभियान महत्वपूर्ण ठरले आहे. या अभियानातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली असून उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला येथे २३ शेततळी शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून तयार केल्यामुळे खोसेटोला हे शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.
गोरेगाव तालुक्यातील १६३ कुटुंबाचे ८०९ लोकवस्ती असलेले खोसेटोला हे गाव. इथल्या ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांश धान उत्पादक शेतकरी असलेल्या या गावात शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाच्या कामात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. व्यसनासाठी गावात एकही पानटपरी नाही. ग्रामस्थांनी स्वत:ला शेती व दूध व्यवसायात व्यस्त करुन घेतले आहे. गावातील ६८ शेतकऱ्यांना चार वर्षापूर्वी कृषी ‍विभागाने ५० टक्के अनुदानावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमातून ८८ जर्सी व होस्टन जातीच्या दुधाळ गायींचे वाटप केले. या गायींपासून १३५० लिटर दुधाचे संकलन दररोज करण्यात येते. त्यामुळे खोसेटोल्यातील अर्थकारणात दुग्धव्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेत इथल्या शेतकऱ्यांनी सहभागी होवून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण केली आहे.
खोसेटोला गावचे २९४.६० हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली असून भात हे इथले प्रमुख पीक आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात २६४ हेक्टरवर धान पीक घेण्यात येते. परंतू रब्बी पिकांसाठी सिंचनाची सोय नसल्यामुळे इथला शेतकरी मुख्यत: खरीप हंगामावर अवलंबून शेती करतो. सन २०१५-१६ या वर्षात राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला.
खोसेटोल्याच्या ग्रामस्थांना गोरेगाव तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व पटवून दिले. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य नसल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. पहिल्याच वर्षी २०१५-१६ मध्ये खोसेटोला गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याचे महत्व पटवून दिले. गावातील तब्बल २३ शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या शेतात शेततळे तयार करण्याचा निश्चय केला. ३० बाय ३० आकाराची ३ मीटर खोलीची ८ शेततळी, ३० बाय २५ आकाराची ६ शेततळी, २५ बाय २५ आकाराची ३ आणि ४५ बाय २० आकाराची ३ शेततळी अशी एकूण २३ शेततळी खोसेटोल्यातील २३ शेतकऱ्यांच्या शेतात जलयुक्त शिवार अभियानातून तयार करण्यात आली. या २३ शेततळ्यातून ४०.२६ टीसीएम पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांची ८० हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली.
जलयुक्त शिवार अभियानातून खोसेटोल्यातील २३ शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी तयार करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी असलेले गाव म्हणून खोसेटोल्याची ओळख झाली. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी शेजारधर्म म्हणून बाजूच्या शेतकऱ्यांना सुध्दा भाताचे पऱ्हे लागवडीकरीता शेततळ्यातून पाणी दिले.
सप्टेंबर महिन्यात धानाची रोपे गर्भावस्थेत व ओंबीच्या अवस्थेत असतांना २५० मि.मी. पावसाची आवश्यकता असतांना प्रत्यक्षात २२२ मि.मी. तर ऑक्टोबर महिन्यात २०० मि.मी. पावसाची आवश्यकता असतांना प्रत्यक्षात ९६ मि.मी. पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना धानपिकाच्या उत्पन्नात घट व्हायची. परंतू निसर्गाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये दगा दिला तरी शेततळीतून संरक्षित सिंचनाच्या आधारावर शेतकऱ्यांनी चांगले धानाचे उत्पादन घेतले. शेततळी असलेल्या शेतकऱ्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना शेततळ्यातून पाणी दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झाली. खोसेटोल्याचे शेतकरी खेमचंद बिसेन म्हणाले, घरी असलेल्या साडेचार एकर शेतीतील धानाची रोवणी शेततळ्यातील पाण्यामुळे झाली. शेजारच्या रुपचंद पारधी या शेतकऱ्याला रोवणीसाठी पाणी दिले. पुढे या तळ्यातील पाण्यातून मत्स्यशेती सोबतच हरबरा, जवस पीक घेणार असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे खोसेटोल्यातील शेतकरी सुखावला आहे.