सालेकसाजवळ मालगाडीचा डबा घसरला

0
39

सालेकसा : हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर सालेकसानजिक मालगाडीचा डबा रूळावरुन उतरून फरफटत गेल्याने १0 तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. घसरलेल्या डब्यामुळे ३00 मीटरपर्यंतच्या रूळावरील सिमेंटचे स्लीपर तुटून निकामी झाले. त्यामुळे नागपूर, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या अपलाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभर रेल्वे लाईनच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
मध्यरात्रीनंतर साधारणत: १.३0 वाजताच्या सुमारास रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने जात असलेली सदर मालगाडी सालेकसा स्टेशन येण्यापूर्वी दोन कि.मी. अंतरावर असताना मालगाडीच्या मधल्या डब्याच्या चाकांमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो डबा रूळावरुन खाली उतरला. त्यामुळे डब्याच्या उजव्या बाजूची सर्व चाके दोन रूळांच्या मध्ये असलेल्या सिमेंटच्या स्लिपरवरुन चालू लागली. यामुळे ते स्लिपर मधातून तुटू लागले. जवळपास ३00 मीटरपर्यंत डबा फरफटत गेल्याने त्यातून आगीच्या ढिणग्या निघू लागल्या. ही बाब हलबीटोला गेटवरील चौकीदाराच्या लक्षात आली. त्याने लगेच चालक आणि गार्ड यांना यासंदर्भात कळविले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. वरिष्ठांना या घटनेची सूचना दिल्यानंतर रायपूरवरुन नागपूरकडे धावणार्‍या सर्व गाड्या मध्येच थांबविण्यात आल्या.