पेट्रोल, डिझेल महागले

0
11

नवी दिल्ली (पीटीआय)- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्‍क्‍यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरू होती. याआधी 16 ऑगस्टला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आली होती. मागील पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात सुमारे 13 टक्के म्हणजेच प्रतिबॅरल 5 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांच्या भावातही वाढ झाली आहे. चालू आंतरराष्ट्रीय भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची गरज होती, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. मागील पंधरवड्यामधील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलरचा भाव पाहून आयओसीसह सरकारी मालकीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात.