कुंभीटोल्यात जलयुक्तमुळे गवसला कृषी समृध्दीचा मार्ग

0
8

berartimes.com
गोंदिया,दि.7- शेती हा ग्रामीण जीवनाचा आधार. बहुतांश शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून शेती करणे म्हणजे बेभरोशाचे काम. मात्र राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाने ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना जलसाक्षर करण्याचे महत्वपूर्ण काम केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावातील पाणी गावशिवार आणि शेतातील पाणी शेतशिवारात अडविण्यात आले. पाणी अडवून भूगर्भात जिरविण्यात आल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. संरक्षित आणि विकेंद्रीत पाणीसाठे जलयुक्त शिवार अभियानातून तयार करण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादकता देखील वाढली.
सन २०१४-१५ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व कृषि विभागाने शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे शेतकरी जलसाक्षर झाले. अभियानाच्या माध्यमातून अडविण्यात आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर शेतीच्या सिंचनासाठी कसा करता येईल यादृष्टीने संबंधित गावांनी नियोजन देखील केले.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला हे शेतकरी बहुल गांव. गावातील कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतमजूरी करणारे कुटुंबही गावात आहेत. कुंभीटोल्याचे भौगोलिक ३२८ हेक्टर क्षेत्रापैकी २२८ हेक्टर जमीन ही पिकाखाली आहे. मुख्य पीक धानाचे असल्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून तर रब्बी हंगामात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे काही शेतकरी धान पिकच घेतात.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषि विभागाने तीन सिमेंट नाला बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे हे नाले दुथडी भरुन वाहू लागले. नाल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना बंधाऱ्यामुळे अडलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात करता आला. २ एकर शेती असलेले शेतकरी गहाणे म्हणाले, या बंधाऱ्यामुळे शेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली. धान पिकाला एका पाण्याच्या कमतरतेमुळे येणारी घट भरुन तर निघाली सोबत उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. नाल्याच्या परिसरात असलेल्या विंधन विहिरी आणि विहिरींतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. आता रब्बी हंगामात जलयुक्त शिवार अभियानातून नाल्यावर बांधलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे उपलब्ध पाण्यातून लाखोरी, जवस आणि हरबरा पीक घेण्याचे नियोजन केल्याचे गहाणे यांनी सांगितले.
बोडी नुतनीकरणाचे काम जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता तर वाढलीच सोबत शेतीतून जास्त उत्पादन घेण्याचा आत्मविश्वास बळावल्याचे पृथ्वीराज राऊत या शेतकऱ्याने सांगितले. पूर्वजांनी बांधलेल्या बोडीतील गाळ काढण्यात येवून ती खोल करण्यात आल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली. बोडी नुतनीकरणामुळे संरक्षित पाणीसाठा निर्माण झाला. संरक्षित पाणीसाठ्याचा वापर पुढे रब्बी हंगामात भाजीपाला, जवस, हरबरा, लाखोरी, उडीद व मुगाचे पीक घेण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीपुरक व्यवसाय म्हणून मत्स्योत्पादन बोडीतून करण्याचा विचार असल्याचे राऊत म्हणाले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आणि बोडीतील गाळ काढण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढल्याचे त्यांनी सांगितले. बोडी नुतनीकरणामुळे जवळपास ३ हेक्टर शेतीला फायदा झाल्याचे राऊत म्हणाले.
कुंभीटोल्याच्या वहितीखालील क्षेत्रातील परिसरात तीन सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरणाची ५ कामे, १ शेततळे निर्मिती, बोडी खोलीकरणाचे एक काम, भात खाचरे दुरुस्तीची १३ कामे आणि बोडीतील गाळ काढण्याचे तीन कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानातून ही कामे करण्यात आल्यामुळे १५०.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला.जलयुक्त शिवार अभियानातून कुंभीटोल्याच्या वहितीखालील क्षेत्रात संरक्षित जलसाठा तर निर्माण झालाच सोबत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. शेतीत गाळ टाकण्यात आल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील वाढली. कुंभीटोल्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषी समृध्दीचा मार्ग गवसल्याचे शेतकरी अभिमानाने सांगू लागले आहेत.