जिल्हयातील ३७ आरोग्य संस्थांचा कायापालट ;जिल्हाधकारी डाॅ.सूर्यवंशीचा पुढाकार

0
14

खेमेंद्र कटरे

गोंदिया,berartimes.com दि.२८ : राज्याच्या पुर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हयात कोणतेही मोठे उद्योग आज घडीला उपलब्ध नाही. जिल्हयातील जास्तीत जास्त जनता ग्रामीण भागात राहत असल्याने ग्रामीण जनतेला  आरोग्याच्या उत्कष्ट सेवा देण्यासाठी कायापालट या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३७ आरोग्य संस्थांनी कात टाकली आहे. कायापालट योजना राबविण्यासाठी जिल्हयातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या मदतीने योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून आरोग्य विभागाकडून चांगली सेवा मिळावी याकरीता जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २०१५ पासून कायापालट ही अभिनव योजना राबविण्यास खरी सुरवात झाली.गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील ही एक यशस्वी योजना ठरली आहे.

जिल्हयातील शहरातील व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यात एक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, एक बाई गंगाबाई शासकीय महिला रुग्णालय, तिरोडा येथील एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय, चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचवीस आयुर्वेदिक दवाखाने आणि २३६ प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहेत. कायापालट योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय, ५ ग्रामीण रुग्णालय, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ आयुर्वेदिक दवाखाने आणि ६ प्राथमिक उपकेंद्र अशा एकूण ३७ आरोग्य संस्थांनी कायापालट अंतर्गत बाह्य व अंतर्गत सुधारणा करुन रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयाकडे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची पाऊले आता कायापालटमुळे या शासकीय आरोग्य संस्थांकडे वळली आहे.unnamed-1

चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लहान मुलांसाठी बालोद्यान विकसीत करण्यात आले आहे. चोपा, चान्ना/बाकटी व हिरडामाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वाचनाकरीता वर्तमानपत्रे, मासिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांच्या तक्रारी ऐकण्याकरीता व त्या सोडविण्याकरीता तक्रारपेटी आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण कल्याण समिती, कार्यकारी मंडळ, सल्लागार समितीचे नामफलक लावण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील महत्वाचे अधिकारी, रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी ,परिचारीका, वाहन चालक यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक व त्यांच्या सेवेची वेळ अशी माहिती असलेली कर्तव्यतालिका सुध्दा या आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या आरोग्य केंद्रात औषध भंडार उपलब्ध आहे. तसेच औषधांची वर्गवारी सुध्दा योग्य पध्दतीने करण्यात आली आहे. रुग्णालयात औषधी नोंदणीकरीता स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे. चोपा व चान्ना/बाक्टी या दोन आरोग्य केंद्रात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यास अदानी उद्योग समुहाने मदत केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालटमुळे झालेला बदल व रुग्णांना मिळत असलेली चांगली सुविधा तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाईकांना मिळत असलेल्या सौजन्यशील वागणूकीमुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची पाऊले शासकीय आरोग्य संस्थेकडे वळत आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा कायापालट होत आहे. त्यामुळे आज आरोग्य संस्थांमध्ये रुग्‍णांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास कायापालट योजना महत्वपूर्ण ठरत आहे.
ग्रामीण भागातील काही रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याकरीता बाकडे नव्हते, तर काही रुग्णालयातील परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. इमारतीची रंगरंगोटी न केल्यामुळे इमारतीकडे बघताच उदासिनता दिसून येत होती. आरोग्य केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची झाडे लावली नसायची, रुग्णालयाच्या नावाची पाटी देखील लहान अक्षरात असायची. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक योजनांची माहिती नसायची. डॉक्टर व कर्मचारी रुग्ण व नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे बोलत नसल्यामुळे रुग्णाला नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत होते. परंतु मागीलवर्षी पासून सुरु झालेल्या कायापालट योजनेने ग्रामीण व शहरी भागातील काही आरोग्य संस्थांचा कायापालट होण्यास मदत झाली. पूर्वी गावातील शासकीय आरोग्य संस्थेतील असुविधेबाबतच्या तक्रारी ग्रामस्थ ग्रामसभेतून करायचे. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा खऱ्या अर्थाने कायापालट झाल्यामुळे पूर्वी तक्रार करणारेच आता आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावीत आहे. या योजनेला शहरी तसेच ग्रामिण भागातील जनतेचे भरपूर सहकार्य ‍मिळत आहे.
कायापालटमुळे रुग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, साफसफाई करण्यात आली. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ झाला. परिसरात झाडे लावण्यात आली. रुग्णालयातील वार्डाच्या खिडक्यांची फुटलेली काचेची तावदाने बदलण्यात आली. पडदे-बेडशीट नियमीत बदलण्यात येत आहे. पंखे दुरुस्त करण्यात आली. रुग्ण व नातेवाईकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी वॉटर प्युरीफायर, डासापासून प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले साहित्य जवळील रुग्णालयात अतिरिक्त असल्यास रुग्णालयातून मागवून घेण्यात आले. पुरेसा औषधसाठा उपलब्ध झाला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना व नातेवाईकांना आरोग्यविषयक योजनांची माहिती देत आहेत. त्या योजनांचा प्रत्यक्षात लाभ सुध्दा रुग्णांना देण्यात येत आहे. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्यात येत आहे आदि कामे करण्यासोबतच आरोग्य संस्थेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मुक्कामाच्या काळात गैरसोय होवू नये यासाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहे. रुग्णाला आंघोळीसाठी गरम पाणी सुध्दा उपलब्ध होत आहे. काही रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त व खाटाची संख्या कमी असल्याने रुग्णाला व नातेवाईकांना अशावेळी खाटांची संख्या व नविन गादया रुग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत.
आरोग्याच्या विविध योजना, जागरुकतेबाबत पोस्टर्स, बॅनर्स आरोग्य संस्थेच्या दर्शनी भागात लावून आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात येत आहे, आरोग्य संस्थेत आठवडी स्वच्छतेचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. त्यानूसार आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता करण्यात येत असते. आरोग्य संस्थांमध्ये रात्रीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वीजपुरवठा नसल्यास सौर दिव्याची तसेच वॉल कंपाउंडची व्यवस्था, इमारतीची डागडूजी करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेतील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याकरीता प्रतिक्षालय, स्वागत कक्ष व बसण्याकरीता खुर्च्यांची व्यवस्था, मनोरंजनासाठी दूरदर्शन संचाची व्यवस्था प्रतिक्षालयात करण्यात आली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात वैदकीय अधिकारी यांच्या कक्षात रुग्णाला तपासणी करीता टेबल व आवश्यक साधन सामुग्री, संस्थेचा नकाशा, तसेच मागील तीन वर्षाचा लेख जोगा याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत महिला वार्ड व पुरुष वार्ड अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसुती कक्षात रुग्णांच्या संख्येनुसार टेबल लावण्यात आले आहेत. रुग्णालयातील महिला वार्डात न्यू बॉनी बेबी कार्नर, ट्रे एल्बो, ऑपरेटेड ट्रप आहेत. या आरोग्य संस्थांमध्ये शस्त्रक्रिया कक्षात निर्जंतुकीकरण करण्या बाबतचे प्रोटोकॉल्स लावण्यात आले आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नोंदवही, ऑटोक्लेव्ह नोंदवही, फ्युमीगेशन नोंदवही, शस्त्रक्रिया नोंदवही, स्वतंत्र काचेच्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत.