भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकाही खिशात!

0
11
India's Amit Mishra, second right, celebrates with teammates after taking the wicket of New Zealand's BJ Watling, foreground in black, during their fifth and last one day international cricket match in Visakhapatnam, India, Saturday, Oct. 29, 2016. (AP Photo/Aijaz Rahi)

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम,दि.29 : विशाखापट्टणमच्या फिरकीच्या आखाड्यामध्ये न्यूझीलंडचे फलंदाज आज (शनिवार) भारतीय गोलंदाजांसमोर टिकूही शकले नाहीत आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांची मालिकाही भारताने 3-2 अशी जिंकली. अमित मिश्राने केवळ सहा षटकांमध्येच पाच गडी बाद केले.

रोहित शर्माला गवसलेला सूर आणि विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीच्या उपयुक्त योगदानांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक पाचव्या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सहा गडी गमावून 269 धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान न्यूझीलंडला पेलवलेच नाही. पहिल्याच षटकात उमेश यादवने अप्रतिम चेंडूवर मार्टिन गुप्टिलचा त्रिफळा उडविला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरीच लावली.

वास्तविक, ही खेळपट्टी फलंदाजी फार अवघड नव्हती. याच खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि कोहलीने अर्धशतके झळकाविली होती. उमेश यादव आणि जसप्रित बुमराह या वेगवान गोलंदाजांचा ‘स्पेल‘ न्यूझीलंडने कसाबसा खेळून काढला. त्यानंतर धोनीने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांद्वारे आक्रमण सुरू केले. अक्षर पटेलने धोकादायक केन विल्यम्सनला बाद केल्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. अमित मिश्रा, पटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऑफस्पिनर जयंत यादव या तिघांनी मिळून आठ गडी बाद केले. विशेष म्हणजे, अमित मिश्राने सहा षटकांत 18 धावा देत पाच गडी बाद केले. न्यूझीलंडचा हा डाव केवळ 23 षटकेच चालला.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरवात केली. पण अजिंक्‍य रहाणे पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. केवळ 20 धावा करून तो बाद झाला. या मालिकेमध्ये रहाणेची फलंदाजी बहरलीच नाही. रहाणे लवकर बाद झाल्यामुळे रोहित शर्मावरही दडपण आले होते. पण कोहलीच्या साथीत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास सुरवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली.

या मालिकेत प्रथमच रोहित शर्माला सूर गवसला. त्याने 65 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 70 धावा केल्या. 22 व्या षटकात रोहित बाद झाला, तेव्हा भारताच्या 119 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कोहली-धोनीच्या जोडीने पुन्हा एकदा महत्त्वाची भागीदारी केली. 59 चेंडूंत 41 धावा करून धोनी बाद झाला. त्यानंतर धावगती उंचावण्याच्या प्रयत्नांत कोहलीही बाद झाला. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये केदार जाधव (37 चेंडूंत नाबाद 39) आणि अक्षर पटेल (18 चेंडूंत 24) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने अडीचशे धावांचा टप्पा पार केला.

धावफलक:
भारत : 50 षटकांत 6 बाद 269 

अजिंक्‍य रहाणे 20, रोहित शर्मा 70, विराट कोहली 65, महेंद्रसिंह धोनी 41, मनीष पांडे 0, केदार जाधव नाबाद 39, अक्षर पटेल 24, जयंत यादव 1
अवांतर : 9
न्यूझीलंड : 23.1 षटकांत सर्वबाद 79
टॉम लॅथम 19, केन विल्यम्सन 27, रॉस टेलर 19
गोलंदाजी : अमित मिश्रा 5-18, अक्षर पटेल 2-9, जयंत यादव 1-8, उमेश यादव 1-28, जसप्रित बुमराह 1-16