अपंग वित्त व विकास महामंडळास राष्ट्रपती पुरस्कार

0
13

नागपूर दि.२१: दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अपंग वित्त व विकास महामंडळास केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात महामंडळाचे अध्यक्ष व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महामंडळाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल करण्यात आला. यामध्ये राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करणे, कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करून नियमांमध्ये शिथिलता आणणे, राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य कला व उद्योजकता संमेलन आयोजित करणे, दिव्यांग उद्योजकांचा ‘दिव्यांग उद्योग भूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करणे, कर्ज शिफारशीमधील अनियमितता टाळण्यासाठी लाभार्थी मूल्यमापन चाचणी राज्यभर लागू करणे, दिव्यांग स्वावलंबन अभियान राज्यात राबविण्याचा निर्णय घेणे, कर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गेल्या दोन वर्षात तीन हजाराहून अधिक दिव्यांग व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्यात आला.
महामंडळाचा प्रगतीचा चढता आलेख पाहून राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाने २१ कोटी रुपयांचा निधी महामंडळास उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी ‘ई-रिक्षा’ व १00 पात्र दिव्यांगांना चारचाकी वाहन घेण्याकरिता कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही बडोले यांनी सांगितले.