विदेशी शास्त्रज्ञही मजीतपूरचे फार्म बघून भारावले

0
22

गोंदिया,दि.01 -भारतात आयोजित १४ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायचोड्रेमा परिषदेत सहभागी झालेल्या १२ देशातील सुमारे ६७ शास्त्रज्ञांच्या चमुने गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील रूची एग्रो फार्मला भेट देऊन ट्रायचोड्रेमचा उपयोग, उत्पादन व वापरासंदर्भात माहिती घेतली.
या शास्त्रज्ञांच्या चमुत न्यूझीलंड, चीन, इजराईल, लोवासाटे, स्पेन, यूएसए, फ्रांस, टेक्सास, स्विडन, कोस्टारिया या देशातील शास्त्रज्ञांसह भारतातील शास्त्रज्ञ व पीकेव्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. ज्यात, डॉ. प्रतिभा शर्मा, डॉ. आर. बी. सोमानी, कुलदीपसिंग ठाकूर, डॉ.रामेश गाडे, डॉ. सुभाष पोटदुखे, डॉ. एस.बी.ब्राम्हणकर, भालचंद्र ठाकूर यांचा समावेश होता.
सध्या संपूर्ण जगात कीटकनाशकांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. अगदी सुक्ष्मपातळीवर यांचे नियोजन सुरू असून संशोधनातून जमिनीतून होणार्‍या विविध पिकांवरील रोगांवर जैविक उपाययोजना म्हणून जैविक बुरशीनाशक म्हणून ड्रायचोड्रेमाचा उपयोग केला जात आहे.
या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी देश विदेशातील शास्त्रज्ञ मजितपूर येथील डॉ. भालचंद्र ठाकूर यांच्या शेतात पोहोचले. दरम्यान येथील तंत्रज्ञान पाहून चीन, न्यूझीलंड येथील शास्त्रज्ञांना भूरळ पडली. चीन येथील डॉ. ली म्हणाले, चीन येथील शेती भारतासारखीच आहे. परंतु, आमच्याकडे कीडरोगांचा प्रादुर्भाव अधिक आहे. या रोगांवर आम्ही देखील मात करू शकलो नाही. परंतु, भारतात जैविक शेती करत असताना देखील बुरशीनाशक औषध तयार करून प्रगत शेतीकडे भारतातील शेतकर्‍यांनी वाटचाल केली आहे. न्यूझीलंड येथील शास्त्रज्ञ जॉन हॅम्प्टन म्हणाले, आम्ही आमच्या देशात शेती आणि चार्‍याच्या कुरणांवरील कीडरोग संपुष्टात आणण्याकरिता प्रयोग करतो. परंतु, आम्हाला अद्याप जे यश आले नाही. ते यश भारतातील शास्त्रज्ञांना आले आहे. आम्ही पाश्‍चिमात्य लोक आत्तापर्यंत आपल्यालाच तंत्रज्ञान आणि शोधकार्यात महान समजत होतो. परंतु, नागपूर येथील संमेलन आणि मजितपूर येथील भालचंद्र ठाकूर यांच्या शेतीची प्रगती बघून भारतातील शेतकरी आणि येथील संशोधन आमच्या पुढे असल्याची प्रचिती आली. या परिषदेत संपूर्ण जगातून २५0 लोक सहभागी झाले. यात १७७ प्रोजेक्ट तर १७५ शोधप्रबंध सादर झाले. यावरून ही परिषद किती महत्वाची आहे हे लक्षात येऊ शकेल. पुढील १५ वी परिषद स्पेनमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.