जलयुक्त शिवारमुळे 94 गावे ‘वॉटर न्यूट्रल’

0
11

गोंदिया,दि.04-राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.मराठवाड्यात या योजनेमुळे पाणीटचांई जवऴजवळ कमी होऊ लागली असताना सिंचनाने समृध्द असलेल्या कधीच टंचाई न भासलेल्या गोंदिया जिल्ह्यातही योजनेने यशाचे शिखर गाठले आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील ९४ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ झाली आहेत. यातील ८४ गावे शंभर टक्के तर १० गावे ८०-९९ टक्याच्या घरात आहेत.जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाव निहाय पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ९४ गावांपैकी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे १५० टक्के पाणी आहे. त्यानंतर म्हसवानीत १२० टक्के तर देवरी तालुक्यातील पदमपूर या गावात ११८ टक्के पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात सुरु केलेल्या या अभियानाला वर्तमान जिल्हाधिकारी डाॅ.काळे यांनीही त्याच गतीने पुढे नेण्यास सुरवात केली आहे.

शेतशिवारात पडलेले पावसाचे पाणी अडवून त्याला जमीनीत मुरलेल्या पाण्याचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवार अभियानात ठरविण्यात आलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचन क्षमता व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमाखर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी आहे. प्रकल्प आरखड्यानुसार जिल्ह्यातील ९४ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ झाली आहेत. ही ९४ गावे पिण्याच्या पाण्याच्या व सिंचनाच्या टंचाईतून कायमची मुक्त झालीत.

यात आमगाव तालुक्यातील ४ गावे, सडक-अर्जुनी तालुक्यातील ५ गावे, देवरी तालुक्यातील ७ गावे, सालेकसा तालुक्यातील १३ गावे, तिरोडा तालुक्यातील २४ गावे, गोरेगाव तालुक्यातील १३ गावे, गोंदिया तालुक्यातील २४ गावे व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामुळे जिल्हा विदर्भात प्रथम क्रमांकावर आला आहे. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या सुटणार आहे.