गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीवरच्या पुलाचे उद्घाटन

0
23

गडचिरोली,दि.30- महाराष्ट्र व तेलंगणासह आंध्रप्रदेशला जोडणार्या गोदावरी नदीवरील पुलाचे आज लोकार्पण राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातल्या सिरोंचावासियांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला.28 वर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याचे आगमन सिरोंचा येथे या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले होते.महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून सतराशे किलोमीटरवर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे राज्यपाल विद्यासागरराव यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्बीशराव आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक आदी उपस्थित होते.

गेल्या शंभर वर्षापासून या भागातल्या जनतेन बघितलेले या पुलाचे स्वप्न पूर्ण झाले.नदीच्या पलीकडे नेहमीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पाहणा-या सिरोंचावासियांना यानिमित्ताने तब्बल 28 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं दर्शन झाले.माओवाद्यांच्या कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागात पहिल्यांदाच इतके मंत्री येत असल्याने या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.