नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य- नितीन गडकरी

0
16

गडचिरोली, दि.३०: नावीन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असून, त्याद्वारेच देशाचा विकास करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. गडचिरोली येथे १२ हजार ४६ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमतीच्या पाच राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण श्री.गडकरी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, आ.मितेश भांगडिया, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी.जोशी, जिल्हाधिकारी रंगा नायक आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, नावीन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असून, त्याआधारेच सरकार देशाचा विकास करीत आहे. सद्य:स्थितीत देशात ९६ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. परंतु देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने राष्ट्रीय महामार्गाची लांबी २ लाख किलोमीटरपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. राज्यात ५२०० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी आता २२३८० किलोमीटर करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातून जाणारे ६ राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहेत. गडचिरोली-मूल हा महामार्ग ५०० कोटींचा, तर गडचिरोली-आष्टी हा महामार्ग ६०० कोटी रुपयांचा आहे. हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून, दोनशे वर्षे खड्डे पडणार नाहीत, अशी त्यांची गुणवत्ता असणार आहे. जिल्ह्‌यातील ३ हजार कोटी रुपयांच्या कामांना गती देण्यात येत असल्याचे सांगून नितीन गडकरी यांनी गडचिरोली शहराबाहेरुन जाणाऱ्या रिंगरोडसाठी दोनशे कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी केली. आता रस्त्याशिवाय जलमार्गाच्या वाहतुकीलाही विशेष महत्व देण्यात येत असून, नद्यांमधून जलमार्ग करण्यासाठी रिव्हर पोर्ट करण्यात येणार असल्याचेही श्री.गडकरी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांनी युती शासनाच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात चांगल रस्ते बनविले व आताही विकासकामांचा वर्षाव केल्याचे सांगून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. विकासासाठी कनेक्टीव्हीटी आवश्यक असून, रस्ते निर्मितीतून सर्वाधिक रोजगार निर्मिती होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगले रस्ते झाल्यास येथे उद्योग येतील आणि बेरोजगारांना विविध माध्यमातून रोजगार मिळेल, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.सुरजागडचे लोहखनिज देशात सर्वोत्कृष्ठ आहे. त्या खनिजावर आधारित प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच सुरु होणार असून, सरकारने जागा शोधून ठेवली आहे. प्रकल्प जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही आणि बाहेरच्या लोकांना काम देता येणार नाही, असा दम देऊन मुख्यमंत्र्यांनी सरकार जिल्हावासीयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.